13 वर्षीय मुलीचा विवाह करून मनाविरुद्ध लैंगिक संबंध

नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरे येथील घटना || मुलीची आई, मावशी व काका तसेच पती, सासू-सासर्‍यांसह अन्य तिघांवर गुन्हा दाखल
13 वर्षीय मुलीचा विवाह करून मनाविरुद्ध लैंगिक संबंध
file photo

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याची घटना नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथे घडली. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून पीडितेची आई, मावशी व काका यांचेसह नवरा, सासू-सासरा व आई-वडील यांचे विरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नेवासा फाटा येथील एका शाळेत शिकणार्‍या मुलीने फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, माझी आई, मावशी, काका दोन्ही रा. निपाणी चौकी जामदार वस्ती, अशोकनगर ता. श्रीरामपूर यांनी दि. 24 मे 2021 रोजी माळीचिंचोरा ता. नेवासा येथील एका तरुणाशी त्याचे राहते घरी माळीचिंचोरा गावात लग्न लावून दिले. तसेच सदर ठिकाणी हजर असणारे माझे सासरा, सासू दोन्ही यांनी मी लहान मुलगी असताना व मला काहीही कल्पना नसताना माझे लग्न केले आहे. लग्नाचे अगोदर मला माझ्या आईने मावशीचे घरी नेऊन ठेवले होते. तेथूनच माझे लग्न करुन दिले होते. सदरची बाब माझे आजोबा यांना माहिती नव्हती.

लग्नानंतर मी माझे सासरी 5 सप्टेंबरपर्यंत नांदले. त्या दरम्यान वेळोवेळी नवर्‍याने माझी इच्छा नसताना बळजबरीने माझेशी शरीरसंबध केले. मला घरकाम येत नाही म्हणून मला माझा नवरा, सासू सासरे हे दररोज शिवीगाळ करुन मारहाण करत असत. मी त्यांना मला माझे घरी नेऊन घाला असे म्हणत असे. त्यामुळे मला बाहेरची बाधा झालेली आहे, ही आपले घरी राहत नाही म्हणून मला दोन वेळा मांजरी ता. राहुरी या ठिकाणी एका देवलाशाकडे तसेच खरवंडी ता. नेवासा येथील देवलाशाकडे उपचारासाठी नेले होते. तिथे मला मारहाण करण्यात आली.

5 सप्टेंबर 2021 रोजी माझ्या नवर्‍याने माझ्या आईला बोलावून घेतले व तिचेबरोबर ही आमचेकडे राहत नाही हिला बाहेरची बाधा झालेली आहे हिला तुमचे घरी घेऊन जा असे सांगून घरातून काढून दिले. त्यानंतर मला माझी आईने मला माझे आजोबाचे घरी खडका ता. नेवासा या ठिकाणी आणले. त्यावेळीही आईने लग्नाची घटना व इतर प्रकार आजोबांना सांगावयाचा नाही असे दम देवून सांगितले होते. त्यानंतर आज दोन दिवसापूर्वी मी झालेला प्रकार माझे आजोबांना सांगितला असून आता मी माझे आजोबासोबत फिर्याद देणेसाठी पोलिस ठाण्यात आले आहे.

या फिर्यादी वरून नेवासा पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 376 (एन), बालकाचे लैंगिक आत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 3 व 4, बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 कलम 9, 10, 11, महाराष्ट्र नरबळी, इतर अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोना यांना प्रतिबंध घालणेबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करणे बाबत अधीनियम 2013 प्रमाणे कलम 13 प्रमाणे मुलीची आई, मावशी व काकासह पती, सासू व सासरे (तिघे रा. माळीचिंचोरा ता. नेवासा) तसेच खरवंडी (ता. नेवासा) व मांजरी (ता. राहुरी) येथे देवलाशी (नाव माहित नाही) या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com