
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने शनिवारी (दि. 15) रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अमोल शोभा कचरे (रा. भारत चौक, सिव्हिल हाडको, सावेडी) याच्याविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कचरे पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 7 नोव्हेंबर 2022 ते 8 जुलै 2023 दरम्यान वेळोवेळी अमोल कचरे याने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने फिर्यादी महिलेची इच्छा नसताना फिर्यादी यांच्या घरी तसेच अमोल कचरे याच्या घरी शारिरीक संबंध केले. दरम्यान, फिर्यादी त्याच्यापासून गरोदर राहिल्याने त्यांनी अमोल याला लग्न कधी करणार, असे विचारले असता त्याने फिर्यादीशी लग्न करण्यास नकार देऊन शिवीगाळ केली आहे. म्हणून फिर्यादी यांनी अमोल शोभा कचरे याच्याविरूध्द शनिवारी (दि. 15 जुलै) तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास सुरू केला आहे.