लग्नसराईवर करोनाचे गडद सावट

एप्रिल महिन्यातील सर्व लग्न स्थगित, कोट्यवधीचा फटका
लग्नसराईवर करोनाचे गडद सावट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या वर्षभरापासून लग्नसराईच्या तोंडावर करोनाचे महाभयानक संकट असल्याने वयात आलेल्या अनेक तरुण-तरुणींचे लग्न न लांबल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे. ‘अहो कुठवर लॉकडाऊन, माझं लगीन गेलय राहून’, अशा शब्दांत ते आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना दिसत आहेत.

वधूवरांसह त्यांच्या घरच्या मंडळींनाही आपल्या मुलांच्या लग्नाची काळजी वाटू लागली आहे. धुमधडाक्यात लग्न करून आपल्या मुलांचे हात पिवळे करू इच्छिणार्‍या वर्‍हाड्यांना आता गुपचूप 25 वर्‍हाड्यांमध्ये लग्न उरकावेत असे आदेश आल्याने 25 लोकांमध्ये लग्न करण्यापेक्षा लग्न पुढे ढकलूया, असे म्हणत अनेकांनी आपली लग्न पुढे ढकलली आहेत.

त्यामुळे नगर शहरासह, श्रीरामपूर, संगमनेर, राहाता, अकोले, कोपरगाव, राहुरी, नेवासा, शेवगाव, पारनेरसह अन्य तालुक्यांत तर एप्रिल महिन्यात तब्बल 100 टक्के लग्न पुढे ढकलण्यात आली आहेत. तर मे महिन्यात ज्यांची लग्न आहेत, ते नव्या नियमावलीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, यामुळे मंगलकार्यालयांचे मालक, चालक, आचारी, बँडवाले, वाढपी, मंडपवाले, डेकोरेशनवाल्यांचे पूर्णत: नुकसान झाले आहे.

एप्रिल महिन्यात मोठ्या संख्येने लग्न पार पडतात. कारण या महिन्यात शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा संपून विद्यार्थ्यांना सुट्टी पडते. त्यामुळे बरीच मंडळी एप्रिल आणि मे महिन्यात लग्न ठरवतात. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही करोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. त्यात राज्य सरकारने नव्या नियमावलीनुसार 25 जणांच्या उपस्थितीत लग्नाला मान्यता दिली आहे. त्यामुळे वर्‍हाडी मंडळींनी लग्न पुढे ढकलली आहेत. एप्रिल महिन्यात तब्बल 150 ते 200 लग्न पुढे ढकलण्यात आली.

वर्‍हाडी नव्या नियमावलीच्या प्रतीक्षेत

सध्या राज्य सरकारच्या नियमावलीनुसार 25 जणांच्या उपस्थितीत लग्न करण्यास मान्यता आहे. तसेच नेहमी धुमधडाक्यात होणारे लग्न आता शांतपणे करावे लागणार आहे. म्युझिक, डिजे, वरात आणि ढोल ताशांवर देखील बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ज्या वधू-वरांची लग्न मे महिन्यात आहेत. ती वर्‍हाडी नवी नियमावलीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना 30 एप्रिलनंतर येणारी नवीन नियमावली अपेक्षित असेल, अशी आशा वाटत आहे. त्यामुळे या वर्‍हाडी मंडळींनी मे महिन्यातील लग्न अद्याप रद्द केलेली नाहीत. परंतु, सध्याचा नियमच मे महिन्यात राहिला तर लग्न पुढे ढकलणार असल्याचे हॉलच्या मालकांना सांगण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com