
उंबरे | Umbare
सध्या लगीनघाई जोरात सुरू झाल्याने साखरपुडा, वरात, लग्न समारंभ यामध्ये डिजे वाजविण्याची प्रथा सुरू झाली असून या डिजेच्या आवाजामुळे अनेक रुग्णांना व लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमात डिजे वाजविण्यास बंदी अथवा आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासकीय पातळीवर स्वतंत्र यंत्रणा असावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.
विवाहामध्ये सर्व चालीरीती मोठ्या प्रमाणात असतानाच प्रत्येक लग्नामध्ये नवरदेव मिरविण्यासाठी व संध्याकाळच्या वरातीसाठी डिजेचा सर्रास वापर केला जात आहे. डिजेचा वापर करत असताना नवरदेव मिरवताना किमान चार ते पाच तास हा डिजे गावामध्ये मोठ्या कर्कश आवाजात असतो. गावामध्ये अनेक नवजात तसेच काही महिने वयाची बालके असतात. काही ठिकाणी काही नागरिकांना हृदय रोग, काहींना उच्च रक्तदाब असल्यामुळे या डीजेचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो. या डीजेचा आवाज एवढा कर्कश असतो की किमान एक ते दोन किलोमीटर अंतरावरील घरातील भांडेसुद्धा थरथर करतात. काही घरांचे पत्रे थरथर आवाज देतात.
सामाजिक कार्यकर्ते या डिजे वाल्यांना सांगायला गेले. तर त्यांच्यासमोर किमान 50 ते 100 मुलांचा घोळका नाचत असतो. मद्यधुंद झालेली मुलं शिवीगाळ करतात. अनेकवेळा भांडणेही होतात. लग्नासाठी आलेली वर्हाडी मंडळी व पाहुणे मंडळी नवरदेव लग्नासाठी लवकर येत नसल्यामुळे अनेकजण लग्न न लावताच निघून जातात. लग्नाची वेळ बारा वाजता असेल तर ते लग्न दोन वाजता लागतात. या सर्व गोष्टीला वधू आणि वराकडील मंडळींना सामोरे जावे लागते. करोनाच्या काळामध्ये कुठलीही वरात नाही, डिजे नाही, अशा परिस्थितीमध्ये अनेकांची लग्ने झाली.
त्यावेळेस मात्र, कुठल्याही नागरिकांना याचा त्रास झाला नाही व विवाहासाठी कुठली हौस करण्यात आली नाही. त्या काळात झालेले लग्न आजही स्मरणात आहेत. या डिजेमुळे रात्री दोन दोन तीन वाजेपर्यंत वरातीपुढे हा डिजे वाजवला जातो. अनेकांना झोपा लागत नाही. लहान लहान मुलं रडतात, काहींना या आवाजामुळे छातीमध्ये दुखते याचा कोणीही विचार करत नाही, हे सर्व घडत असताना शासकीय अधिकारी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात की काय? असाही प्रश्न निर्माण होतो.
जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रशासन यांनी प्रत्येक मंगल कार्यालय व ज्या गावांमध्ये लग्न सोहळा असेल त्याठिकाणी डिजे वाजवण्यास बंदी घालणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवरती निर्णय राबवण्याची गरज आहे. पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि तलाठी यांना शासनाने सक्ती करून कोणी डीजे लावीत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. डिजे वाजवण्यासाठी वशिलेबाजी होऊ नये व तसे घडल्यास शासकीय अधिकार्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली तर निश्चितच जिल्ह्यामध्ये कुठेही डिजे वाजला जाणार नाही व त्यापासून होणारा त्रास थांबेल.