मध्यस्थी पैसे घेऊन जोमात, नवरदेव कोमात!

मध्यस्थी पैसे घेऊन जोमात, नवरदेव कोमात!

चार फेरे घेण्याअगोदरच मध्यस्थी महिला पतीसह गायब, शिर्डीनजीकची घटना

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

चार फेरे घेण्याअगोदरच मध्यस्थी महिला पतिसह विवाहस्थळावरून गायब झाल्याचा आरोप नवरदेवाने केला असून अंगाला हळद लावून शिर्डीत आलेल्या नवरदेवाचा अतिउतावळेपणा नुकसानकारक ठरला आहे.

आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना लग्नासाठी इकडून तिकडून पैशाची जमवाजमव करून नशिबाने अशी ही थट्टा उडवल्याने निराशा पत्करून नवरदेवाने घरची वाट धरल्याचा प्रकार शिर्डीनजीक घडला.

नाशिक येथील एका गरीब कुटुंबातील मुलाला लग्नासाठी शिर्डी नजीकच्या निमगाव येथे राहत असलेल्या त्याच्या मित्राच्या पत्नीने (नाव माहीत नाही) मुलीचा फोटो दाखवला. फोटोवरून मुलाने मुलीला पसंत केले. शिर्डीत मेळाव्यात मुलीशी लग्न लावून देऊ असे ठरले. लग्न जमवून दिल्याचा बदल्यात मित्राच्या पत्नीने आपल्याकडून दहा हजार रुपये घेतल्याचे वर मुलाने सांगितले. विवाहाची तारीख आणि स्थळ ठरवून वर मुलगा अंगाला हळद लावून शुक्रवार दि. 4 जून रोजी नातेवाईकांना घेऊन लग्न लावण्यासाठी शिर्डीत आला होता.

मात्र त्याठिकाणी लग्न मंडप, गाजावाजा आणि नवरीसह मध्यस्थी नसल्याचे दिसून येताच मित्राला फोन केला तर त्याचा फोन बंद आला. त्यानंतर त्याच्या पत्नीला संपर्क केला तिचाही फोन बंद केला असल्याने मध्यस्थी भाडोत्री राहात असलेल्या निमगाव येथील घरी जाऊन बघितले तर घराला देखील कुलुप होते.

हा सर्व प्रकार नवरदेव आणि वर्‍हाडी मंडळीच्या लक्षात आला. यांनंतर आपली घोर फसवणूक झाली असल्याने नवरा मुलाने नातेवाईकांसह थेट शिर्डी पोलीस स्टेशन गाठले. आपली फसवणूक झाल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांनी आपल्याला नाशिक येथे तक्रार दाखल करण्यास सुचवले असल्याची माहिती नवरदेवाने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. यावेळी नवरा मुलाकडे मध्यस्थी तसेच मुलीचे पूर्ण नाव माहीत नसल्याने तक्रार देण्यास अडचण आली. करोनाच्या कठीण काळात आर्थिक घडी विस्कटलेली असताना लग्नासाठी इकडून तिकडून थोडेफार पैशाची जमवाजमव केली त्यातही नशिबाची साथ मिळाली नसल्याने निराशा पत्करून नवरा मुलगा बिना लग्नाचाच आपल्या वर्‍हाडासह गावाकडे परतला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com