बाजारपेठेतील दुकाने सायंकाळी सातपर्यंत सुरू ठेवा
सार्वमत

बाजारपेठेतील दुकाने सायंकाळी सातपर्यंत सुरू ठेवा

भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

करोना लॉकडाऊनच्या नावाखाली शहरातील व्यापार्‍यांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देऊन, संध्याकाळी पाचनंतर त्यांच्यावर होणार्‍या दंडात्मक कारवाईचा भाजप व्यापारी आघाडीच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. तर राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे बाजारपेठेतील दुकाने सायंकाळी सातवाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, भाजप व्यापारी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष विलास गांधी, अ‍ॅड. विवेक नाईक, अनिल गट्टाणी, प्रशांत बोकडीया आदी उपस्थित होते. संपूर्ण राज्य करोनाच्या संकटातून जात आहे. बचावाच्यादृष्टीने लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी काळात व्यापार पूर्णपणे ठप्प होते.

आज जेव्हा जनजीवन सुरळीत होत असताना शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन होण्याच्यादृष्टीने प्रशासनामार्फत कार्यवाहीची मोहीम राबवली जात आहे. परंतु पोलीस आणि महानगरपालिकेचे पदाधिकारी व्यापार्‍यांच्या दुकानात गेल्यानंतर उध्दट भाषा वापरतात. व्यापारी हे गुन्हेगार असल्याप्रमाणे त्यांना वागणूक दिली जात आहे. कारवाईच्या नावाखाली व्यापार्‍यांकडून 500 ते 5 हजार रुपये दंड आकारून दबाव आणला जात असल्याचा आरोप भाजप व्यापारी आघाडीच्यावतीने करण्यात आला आहे.

दंडात्मक कारवाईने व्यापार्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. नियमाचे पालन व्हावे, यादृष्टीने कारवाईकडे पाहणे गरजेचे असताना व्यापारी गुन्हेगार आहेत अशा प्रकारची वागणूक प्रशासनाकडून मिळत आहे. मार्केटयार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकर्‍यांच्या मालाची आवक दाखल होण्यास सुरुवात होणार आहे.

शेतकरी दिवसभरात माल घेऊन येत असताना त्या मालाचा काटा करणे, पाला फोडणे, संच करणे, माल भरणे, पॅकिंग वगैरे सर्व प्रक्रिया चालू असतात. हा माल नाशवंत असल्याने त्याची जोपासना व्हावी म्हणून ज्या वेळेस माल येतो त्यावेळेस ही प्रक्रिया रात्रीपर्यंत चालते. अशा वेळेस व्यापार्‍यांनी काय करावे? शेतकर्‍यांचा माल स्वीकारला नाही किंवा माल घेऊन रात्रीपर्यंत काम केल्यास व्यापार्‍यांना दोषी ठरवले जात असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

यावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे यांच्याकडून निवेदन स्वीकारले. मात्र भाजपच्या पदाधिकार्‍यांचे निवेदन स्वीकारले नाही. त्यामुळे भाजप पदाधिकारी भडकले. हा दुजाभाव केल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे भाजप शहराध्यक्ष गंधे यांनी सांगितले. भाजप व्यापारी आघाडीकडून निवेदन देण्यासाठी शहर जिल्हाध्यक्ष गंधे हे व्यापारी आघाडीच्या पदाधिकार्‍यांसह आले होते. मात्र हे निवेदन कोव्हिडमुळे प्रत्यक्ष हातामध्ये स्वीकारण्यास जिल्हाधिकारी यांनी नकार दिल्याचा दावा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष यांनी केला आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com