12 बाजार समित्यांची मतदार यादी 7 डिसेंबरला होणार अंतिम !

निवडणुकीची पूर्व तयारी || प्रारूप मतदार यादी प्रसिध्द
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Shrirampur

जिल्ह्यातील नगरसह बारा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झाली. त्यासाठी 1 सप्टेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारित प्रारुप मतदार यादी सोमवारी प्रसिध्द करण्यात आली आहे. या मतदार यादीवर 23 नोव्हेंबरपर्यंत हरकती मागविण्यात आल्या असून 7 डिसेंबरला बाजार समितींची अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. जिल्हा उपनिबंधक तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश पुरी यांनी याबाबत माहिती दिली. डिसेंबरमध्ये मतदार यादी अंतिम झाल्यावर नववर्षाच्या सुरूवातीला बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी पेटणार आहे.

करोनामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका लांबणीवर पडल्या होत्या. शेतकर्‍यांचे व राजकीय पदाधिकार्‍यांचे लक्ष लागलेल्या बाजार समित्यांच्या 2022-23 ते 2027-28 या कालावधीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरु झाली आहे. राहुरी, संगमनेर, अकोले, नगर, श्रीगोंदा, पारनेर, कोपरगाव, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, जामखेड व कर्जत या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश आहे. बाजार समिती निवडणुकीचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपनिबंधक पुरी यांनी नगरसह बारा बाजार समित्यांची प्रारुप मतदार यादी सोमवारी (दि.14) प्रसिध्द केली.

ही यादी उपनिबंधक सहकारी संस्था तसेच बारा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कार्यालयांच्या फलकावर उपलब्ध केली आहे. या मतदार यादीवर सोमवारपासून हरकती मागविण्यात आलेल्या आहेत. कार्यालयीन वेळेत 23 नोव्हेंबरपर्यंत हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. येणार्‍या होणार्‍या हरकतींवर 2 डिसेंबरपर्यंत सुनावणी होणार असून, त्याबाबत जिल्हा उपनिबंधक पुरी निर्णय घेणार आहेत. त्यानंतर 7 डिसेंबर 2022 रोजी बाजार समितींची अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com