14 बाजार समित्यांची 20 मार्चला सुधारित अंतिम मतदार यादी

राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या मान्यतेनुसार निवडणूक पूर्व कार्यक्रम सुरू
14 बाजार समित्यांची 20 मार्चला सुधारित अंतिम मतदार यादी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील लांबलेल्या 14 बाजार समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या निवडणुकीचा भाग म्हणून मतदार यादी अद्ययावत करून ती अंतिम करण्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक यांनी घेतला आहे. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण यांच्या आदेशानूसार जिल्ह्यातील बाजार समित्यांची मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून सुधारीत अंतिम मतदार यादी येत्या 20 मार्चला प्रसिध्द होणार असल्याची माहिती सहकार विभागाच्यावतीने देण्यात आली.

जिल्ह्यातील नगर, राहुरी, राहाता, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा आणि पारनेर या 14 बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली असून यातील बहुतांशी ठिकाणी सहकार खात्याचे अधिकारी प्रशासक म्हणून काम पाहत होते. यातील अनेक बाजार समित्यांची निवडणूक कोविड काळात संपलेली असून कोविड संकटानंतर सहकार विभागाने वेगवेगळ्या कारणामुळे मुदत संपलेल्या या बाजार समितीच्या निवडणुका पुढे ढकल्या होत्या.

आता या निवडणूका घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून निवडणुकीची पूर्व तयारी म्हणून 14 बाजार समित्याच्या मतदार यादी तयार करण्यात येत आहे. यासाठी 10 ते 24 फेबु्रवारीपर्यंत 1 सप्टेंबर 2002 पर्यंत नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटीचे संचालक यांची नावे टाकून बाजार समितीची मतदार यादी तयार करावी. त्यानंतर 27 फेबु्रवारीला सुधारीत प्रारूप यादी तयार करून ती प्रसिध्द करण्यास वेळ देण्यात आलेली आहे.

त्यानंतर 8 मार्चपर्यंत प्रारूप मतदार यादीवर हरकती मागवून त्या निकाली काढण्यात येणार असून त्यानंतर 20 मार्चला 14 बाजार समित्यांची अंतिम मतदार प्रसिध्द करण्यात येणार आहे. यानंतरच्या आठ दिवसांत संबंधीत बाजार समितीची निवडणूक जाहीर होणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी सांगितले.

बाजार समितीच्या मतदार यादीत व्यापारी, मापाडी, हमाल यांच्यासह ग्रामपंचायतींचे सदस्य आणि विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक हे सभासद आहेत. तसेच बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात राहणार्‍या आणि कार्यक्षेत्रात सात-बारा उतारा असणार्‍या शेतकर्‍यांना बाजार समितीची निवडणूक लढवता येणार आहे. मात्र, अद्याप त्यांना मतदानाचा हक्क नसल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com