आणखी 12 बाजार समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

आजपासून मतदार यादी कार्यक्रम || 29 जानेवारीला मतदान व 30 जानेवारी 2023 ला मतमोजणी
आणखी 12 बाजार समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील 31 डिसेंबर 2022 अखेर निवडणुकीस पात्र राज्यातील 281 आणि नगर जिल्ह्यातील आणखी 12 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानूसार आज बुधवार (दि.7) मतदार यादी कार्यक्रम सुरू करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी.एल. खंडागळे यांनी दिले आहे.

दरम्यान, नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर आणि राहाता बाजार समितीची निवडणूक न्यायालयाच्या आदेशानूसार जाहीर करण्यात आला असून उर्वरित 12 बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिली. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानूसार जिल्ह्यातील 12 बाजार समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रमानुसार 29 जानेवारी 2023 रोजी मतदान व त्यानंतर 30 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणूका होणार्‍या बाजार समित्यांमध्ये नगर, राहुरी, संगमनेर, अकोला, कोपरगाव, नेवासा, शेवगाव,पाथर्डी, पारनेर, श्रीगाेंंदा, कर्जत आणि जामखेड यांचा समावेश आहे. आधीच्या दोन आणि आता 12 अशा जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांची निवडणूक होणार असल्याचे पुरी यांनी सांगितले.

मतदार यादीसाठी बाजार समितीच्या निवडणुकीकरीता बाजार क्षेत्रातील कार्यरत प्राथमिक कृषी पत संस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांचे सदस्य मतदार असल्यामुळे या सदस्यांची सूची 27 सप्टेंबरपर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी (कृषी उत्पन्न बाजार समिती) यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व गट विकास अधिकारी यांना दिले आहेत. याशिवाय बाजार क्षेत्रातील परवाना धारक व्यापारी, आडते व हमाल, तोलाईदार हे बाजार समितीचे मतदार असल्यामुळे या मतदारांची यादी 1 नोव्हेंबरपर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित बाजार समित्यांना दिलेले आहेत. त्यानंतर 7 डिसेेंबरला जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी हे अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणार आहेत.

असा आहे कार्यक्रम

कृषी उत्पन्न बाजार समित्यांची प्रारूप मतदार यादी 14 नोव्हेंबर रोजी आणि अंतिम मतदार यादी 7 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध होणार आहे. 23 डिसेंबरला निवडणूक निर्णय अधिकारी हे निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असून 23 ते 29 डिसेंबरदरम्यान अर्ज दाखल करण्यासाठी मुदत राहणार आहे. 30 डिसेंबरला दाखल अर्जाची छानणी होणार असून 2 जानेवारी ते 16 जानेवारी 2023 पर्यंत माघारीसाठी मुदत 17 जानेवारीला उमेदवरांची अंतिम मतदार यादी राहणार आहे. तसेच 29 जानेवारी 2023 रोजी मतदान व मतमोजणी 30 जानेवारी 2023 रोजी होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com