
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
सहकार विभागाने माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीकडून खासगी बाजाराप्रमाणेच मुंबई एपीएमसीसह पाच बाजार समित्यांचा अभ्यास होणार आहे. या समितीच्या कार्यकक्षेत आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह पुणे, नाशिक, अहमदनगर आणि नागपूर या 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचाही समावेश केला आहे. येत्या महिनाभरात दांगट समिती अभ्यास करून आपला अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे.
राज्यात बाजार समित्यांचे खासगीकरण करण्याचे वारे सुरू असतानाच राज्यातील पाच प्रमुख बाजार समित्यांचा दांगट समितीत समावेश केल्याने व्यापारी-शेतकर्यांचे आता याकडे लक्ष लागले आहे. व्यापार्यांत स्पर्धा निर्माण होऊन शेत मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी सहकार विभागाने थेट पणन आणि खासगी बाजार आवारांसह कंत्राटी शेती आणि इलेक्ट्रॉनिक व्यापाराचे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे. मात्र, एवढे करूनही शेतकर्यांच्या मालास योग्य भाव मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. सहकार विभागाने 13 सप्टेंबर 2023 रोजी एक समिती स्थापन केली होती.
माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखालील समितीला 75 दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. या समितीत पणन सचिव, संचालकांसह औरंगाबाद, नाशिक, विदर्भातील शेतकरी प्रतिनिधी, व्यापार्यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. दांगट यांची समिती मुंबई एपीएमसीसह पुणे, नाशिक, अहमदनगर आणि नागपूर या बाजार समित्यांचा अभ्यास करणार आहे. येत्या महिनाभरात हा अभ्यास पूर्ण होवून राज्य सरकारला आपला अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
राज्यात नाशिक, औरंगाबाद खासगी बाजार आवार स्थापन झाले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांप्रमाणे लेव्ही भरावी लागते. ती खासगी बाजार आवारातील संचालकांनी वसूल करून शासनाच्या पणन संचालकांकडे जमा करणे अभिप्रेत आहे. अनेक ठिकाणी ती वसूल करून पणन संचालकांकडे जमा न करता शासनाचा महसूल बुडविला जात असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळेच राज्यातील खासगी बाजार समित्यांचा अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील पाच बाजार समित्यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. यात बाजार समित्यांमधील व्यवस्था, खासगी, कंत्राटी बाजार व्यवस्था यांचा अभ्यास करून शेतकर्यांच्या मालाला अधिकाअधिक भाव कसा देता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. येत्या महिनाभरात याबाबतचा अभ्यास करून अहवाल तयार होईल.
- उमाकांत दांगट, माजी कृषी आयुक्त.
अभ्यासाचा विषय...
राज्यातील खासगी बाजार आवार, शेतकरी ग्राहक बाजार यांना प्रातिनिधिक स्वरुपात भेटी देऊन तेथे सुरू असलेले कामकाज, सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करणे, खुल्या पद्धतीने व स्पर्धात्मक लिलावाद्वारे होते किंवा नाही याची पडताळणी करणे. शेतकर्यांना विक्रीपश्चात वेळेत रक्कम मिळते किंवा नाही, कृषी माल खरेदी-विक्रीचे व्यवहार रोखीने न होता डिजिटल पद्धतीने होतात की नाही, याबाबत खात्री करणे. बाजारात सेवा योग्य पुरविल्या जातात का याची पाहणी करून खात्री करणे, बाजार आवारात आगप्रतिबंधक सेवा पुरविली आहे की नाही, याबाबत तपासणी करून अहवाल सादर करणे.