
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्यात करोना रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांना रूग्णालयात, कोविड सेंटरमध्ये बेड, ऑक्सिजन बेड मिळणे कठीण होत आहे. या पार्श्वभूमीवर कोविड उपचाराशी निगडीत विलगीकरण कक्ष, ऑक्सिजन सेंटर, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन बेड, सॅच्युरेटेड, ऑक्सिजन मशीनचा पुरवठा अशा कोविड उपचाराशी निगडीत सुविधा उपलब्ध होण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कोविड-केअर सेंटर सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांना करोनावर उपाययोजना करता येणार आहेत.
याबाबतचे राज्य सरकारच्या सहकार व पणन विभागाने बुधवारी काढले आहेत. यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मागील वर्षाच्या वाढाव्याच्या (नफा) 25 टक्के रक्कमेच्या मर्यादेत कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. यासाठी 10 लाखापर्यंतच्या भांडवली खर्चास मंजूरी देण्याचे अधिकार जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले आहेत. 10 लाखांच्या खर्चावरील प्रस्ताव प्राप्त झाल्यास अशा प्रस्तावाच्या भांडवली खर्चास मान्यता देण्याचे अधिकार पणन संचालकांना देण्यात आले आहेत.
कोविड केअर सेंटर हे प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात सुरू करण्यात यावे. सेंटरवरील विलगीकरण कक्षात बाजार समितीकडून बेड सुविधा उपलब्ध करून देणे व सॅच्युरेटेड ऑक्सिजन पुरवठा करावयाच्या मशीनचा पुरवठा करण्यात यावा. तसेच सेंटरवरील विलगीकरण कक्षात येणार्या रूग्णांना बाजार समितीने दोन वेळेस जेवण व नास्ता व चहा यांची प्रामुख्याने व्यवस्था करावी.
कोविड केअर सेंटर चालविताना राज्य शासनाने कोविड संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करणे कृषी उत्पन्न बाजार समित्यांना बंधनकारक राहील असे सहकार आणि पणन विभागाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यात 14 कृषी उत्पन्न बाजार समित्या असून यातील नगरच्या बाजार समितीने आधीच कोविड सेंटर सुरू केले आहे. उर्वरित ठिकाणी लवकरच कोविड सेंटर सुरू करता येतील, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक दिग्जिय आहेर यांनी दिली.