
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
बाजार समितीने मोठी विकास कामे काढली असता, आपणास त्यात आपल्या ग्रामपंचायतच्या कारभारासारखीच मलाई दिसत आहे का? आपण बाजार समितीच्या उत्पन्नाची काळजी करत आहात, परंतु आपणास काळजी करण्याचे कारण नाही. ते उत्पन्न आपोआप वाढत आहे. दि. 10 सप्टेंबर रोजी संस्थेने वीस लाखांची मुदत ठेव पावती केली असल्याचे प्रत्युत्तर बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांनी उपसभापती अभिषेक खंडागळे यांना दिले आहे.
याबाबात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नवले यांनी म्हटले आहे की, आपण संस्थेच्या कर्जाचा उल्लेख करत आहात. परंतु, याबाबत आपले अज्ञान दिसून येते. पणन विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत गोदाम अनुदान योजनेतून संस्थेस एक कोटी खर्चाच्या योजनेमध्ये 52 लाख रुपये अनुदान मिळालेले आहे. त्यापैकी 43 लाख शासनास भरायचे आहे. ही योजना घेतल्याने संस्थेला 9 हजार स्क्वेअर फुटाचे गोदाम मिळाले आहे. त्या कर्जाची परतफेड चालू आहे. संस्थेकडे कोणतीही थकबाकी नाही. आज मितीस बाजार समितीकडे 1.85 कोटीच्या मुदतठेव पावत्या केलेल्या आहेत.
आपण संस्थेकडे निधी नसल्याबाबत लोकांना सांगून दिशाभूल करत आहात. परंतु, संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. उत्पन्नाचा आलेख वाढता आहे. संस्थेचे कामकाज नियमानुसार चालू आहे. सर्व विषय अजेंड्यावर घेऊन चर्चा केली जाते. त्यामुळे सर्व विषय संचालक मंडळ समोर चर्चेला येतात. म्हणून विषय जास्त दिसतात. सर्व विषयाची उघडपणे चर्चा करणे चूक आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. समितीच्या मुख्य आवारात वर्षापासून बंद असलेले स्वस्त दरातील जेवण शेतकरी भोजनालय चालू केले आहे.
आपण उपसभापतिच्या तुटक्या खुर्ची बद्दल रडत आहात. त्यातून आपण जनतेची सहानभूती मिळवत आहात. परंतु संस्थेमध्ये गेल्या वीस वर्षांपासूनच्या असणार्या बैठक व्यवस्थेच्या खुर्च्या या खराबच झालेल्या होत्या. त्या सर्व आपण मिटिंगमध्ये विषय घेऊन बदललेल्या आहेत. हे आपणास दिसत नाही का?
मलाईदार कामाच्या बाबतीत 126 कोटींचा बोलबाला करता तर पंधराव्या वित्त आयोगातून 90 लाख रुपयांची कमी उंचीची टाकी का घ्यावी लागली, मळगंगा मंदिर जॉगिंग ट्रॅक, गावातील कचरा कुंड्या, सिमेंट ढापे, जि.प.च्या माध्यमातून गावातील खटकळी, गायकवाड वस्ती, राजवाडा येथील वॉटर एटीएम बंद का आहे. हे सर्व मलाईदार कामे घेऊन कोणी पैसे कमावले? असा प्रश्न सुधीर नवले यांनी उपस्थित केला आहे.