बाजार समितीचे भूखंड घोटाळे बाहेर काढणार

आ. राजळे : विरोधकांवर घनाघात, निवडणुकीचे फुंकले रणशिंग
बाजार समितीचे भूखंड घोटाळे बाहेर काढणार

करंजी |वर्ताहर| Karanji

अनेक वर्षांपासून राजळे समर्थकांच्या ताब्यात असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती मतदारांनी विरोधकांच्या ताब्यात दिली. त्यानंतर पाच वर्षांच्या कार्यकाळामध्ये सत्ताधार्‍यांनी अनेक भूखंड लाटले शेतकर्‍यांसह व्यापार्‍यांनाही लुटण्याचे काम केले. येणार्‍या निवडणुकीत सर्व भूखंड घोटाळे बाहेर काढणार असल्याचे संकेत देत आमदार मोनिका राजळे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा जवखेडे दुमाला या दोन गावांना जोडणार्‍या नदीवर सुमारे दीड कोटी रुपयांचा नवीन पूल बांधण्यात येणार असून या कामाचे भूमिपूजन आमदार राजळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आ. राजळे बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करंजी गावचे सरपंच बाळासाहेब आकोलकर होते.

आ राजळे म्हणाल्या, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीत मागील पाच वर्षांपूर्वी जी चूक झाली ती आता होऊ देऊ नका संस्था डबघाईस आणणारांना या निवडणुकीत आता बाजूला ठेवण्याची गरज आहे. एकीकडे खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून पारदर्शक कारभार सुरू असताना दुसरीकडे विरोधकांच्या ताब्यात असलेली मार्केट कमिटी मात्र भ्रष्टाचार भूखंडात बुडाली असल्याचा सनसनाटी आरोप आमदार राजळे यांनी यावेळी केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चारुदत्त वाघ यांनी केले. तर उपस्थितांचे आभार बाळासाहेब भोसले यांनी मानले.

याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून जि. प. सदस्य पुरुषोत्तम आठरे, पं. स. सदस्य राहुल गवळी, एकनाथ आटकर, माजी सभापती उद्धवराव वाघ, धनंजय बडे, कारखान्याचे संचालक कुशीनाथ बर्डे, सुभाष बर्डे, जे. बी. वांढ़ेकर, सरपंच मंदा कसोटे, उपसरपंच भास्कर नेहुल, वसंत नेहुल, तालुका विकास अधिकारी सुभाष वांढेकर, संतोष शिंदे, अ‍ॅड वैभव आंधळे, सचिन नेहुल, पोपटराव कराळे, नारायण कराळे, नामदेव सरगड, जिजाबापू लोंढे, नवनाथ आरोळे, उपसरपंच कासार सर, चेअरमन नजमुद्दिन शेख,भाऊसाहेब नेहुल, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जलयुक्तची कामे चांगली की वाईट ?

जलयुक्त शिवार येाजनेमुळे पाथर्डी तालुक्याचा दुष्काळी शिक्का पुसला जात आहे. मात्र सध्याचे महा विकास आघाडीचे सरकार दुटप्पीपणाची भूमिका घेत आहे. एकीकडे जलयुक्तच्या कामामुळे महापूर आला शेतकर्‍यांचे शेतीचे नुकसान झाले असे म्हणत आहे, तर दुसरीकडे जलयुक्तच्या कामाची चौकशी करणार असेही म्हणत आहे. नेमके म्हणणे काय आहे ते तरी स्पष्ट करा,असे आ. मोनिका राजळे म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com