कांदा 4600 रुपयांवर

कांदा 4600 रुपयांवर

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

सलग तीन दिवसांपासून कांद्याच्या भावात वाढ होत आहे. काल बुधवारी झालेल्या लिलावात नगरसह राज्यातील अनेक बाजार समित्यांच्या आवारात एक नंबर प्रतिच्या उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल 4000 ते 4600 रुपयांपर्यंत भाव मिळाला. बाजारभाव वाढल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळाला असलातरी मोजक्या शेतकर्‍यांकडेच कांदा शिल्लक आहे.

नाशिक आणि नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते. पण यंदा पाऊस कमी झाल्याने या जिल्ह्यांमध्ये कमी प्रमाणात कांद्याची लागवड झाली आहे. आंध्रप्रदेश आणि कर्नाटकात पावसामुळे कांद्याचे पीक घेण्यात महिनाभराचा उशीर झाला आहे. त्यामुळेही कांद्याचे भाव वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी कांद्याला अगदी कमी भाव मिळत होता. कांदा 7 ते 8 रुपये किलोने बाजारात खरेदी करण्यात येत होता. मात्र, आता घाऊक बाजारात कांद्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकर्‍यांना देखील दिलासा मिळत आहे.

पारनेर बाजार समिती आवारात काल 1 नंबर कांद्याला 4500 रुपयांचा दर मिळाला. कोपरगावात 3920 रुपयांचा भाव मिळाला. वैजापूर- शिऊर बाजार समितीत 1000 ते 4000 रूपयांचा दर मिळाला. कोल्हापूर, चाकणलाही 4000 रूपयांचा दर मिळाला. लासलगावात 3611 रूपयांचा दर होता.

श्रीरामपुरात सर्वाधिक भाव

श्रीरामपूर बाजार समिती आवारात काल 94 गोणी कांद्याला 4600 ते 5000 रुपयांचा दर मिळाला असल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली. हा भाव या हंगामातील उच्चांकी आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com