
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांबाबत काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असली तरी या निवडणुकांसाठीची आवश्यक तयारी करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या गेल्या आहेत. एप्रिलअखेरपर्यंत या निवडणुका घेण्याचा प्रयत्न आहे, असे स्पष्टीकरण सहकार मंत्री अतुल सावे यांनी गुरुवारी येथे केले. दरम्यान, बाजार समित्यांच्या निवडणुकीत ग्रामपंचायत व सोसायटी हद्दीतील शेतकर्यांना उमेदवारी करता येईल, पण मतदान करता येणार नाही, असा बदल करण्याचे सूतोवाचही सावे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात सहकार व इतर मागास बहुजनकल्याण विभागाची आढावा मंत्री सावे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पतपेढी व बँकांसह अन्य विविध सहकारी संस्थांपैकी 10 संस्थांची कलम 83 अन्वये व 37 संस्थांची कलम 88 अन्वये चौकशी सुरू आहे. याशिवाय अवसायनातील 403 संस्थांपैकी 6 वर्षांपेक्षा कमी कालावधीपासून अवसायक असलेल्या 156, 6ते 10 वर्षे कालावधीपासून अवसायक असलेल्या 243 व 10 वर्षांपेक्षा जास्त अवसायक कालावधी झालेल्या 4 संस्था असून या सर्व संस्थांची चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगून सावे म्हणाले, भूविकास बँकेच्या 260 कर्जदारांच्या जमिनीवरील बोजा 31 मार्चच्या आत काढला जाईल.
तसेच या बँकेच्या 63 कर्मचार्यांचे थकीत 1 कोटी 93 लाख देण्याबाबतही कार्यवाही केली जाणार आहे. महात्मा फुले कर्ज योजना प्रोत्साहन योजनेत जिल्ह्यातील 56 हजारावर शेतकर्यांच्या खात्यात 204 कोटीरुपये जमा केले गेले आहेत. 2 हजार 854 सहकारी संस्थांपैकी दोन हजारावर संस्थांच्या निवडणुका झाल्या असून 533 संस्थांची प्रक्रिया सुरू आहे व राहिलेल्या 94 संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
सहकार विभागासह सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचार्यांची रिक्तपदे भरण्यात येणार असल्याचे सांगून ते म्हणाले, अवैध सावकारीला निर्बंध घालण्यासाठी महाराष्ट्र सावकारी कायद्याची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करीत अवैध सावकारांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ज्यांनी 10 लाखरुपयांपर्यंतचे कर्ज घेतलेले आहे व ते थकलेले आहे अशा मोठ्या कर्जदारांकडून कर्ज वसुलीची मोहीम प्रभावीपणे राबवावी.
वसुली करीत असताना कर्ज भरण्यास तयार असलेल्या शेतकर्यांसाठी वन टाईम सेटलमेंट योजना लागू करावी, वसुली करताना शेतकर्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये व वसुलीसाठी त्यांच्यामागे तगादा लावू नये, कर्ज वाटपाचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण होण्यासाठी कृती आराखडा तयार करावा तसेच जिल्ह्यातील आश्रम शाळांना अधिकार्यांनी अचानक भेट देऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा मिळतात किंवा नाही याची तपासणी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
त्यांनाच मिळणार लाभ
पीएम किसान कार्ड ज्यांच्याकडे आहे, अशाचशेतकर्यांना यापुढे कृषीसंदर्भातील योजनांचे लाभ देण्याचा निर्णय केंद्र सरकारघेणार असल्याने जिल्ह्यात राहिलेल्या 30 हजार 643 शेतकर्यांना असे कार्ड मिळण्याचीप्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे सांगण्यात आल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले,जिल्ह्यातील 946 सहकारी संस्थांचे संगणकीकरण केंद्र सरकारच्या निधीतून केले जाणारआहे. यामुळे सहकारी संस्थांच्या कामात पारदर्शकता वाढून भ्रष्टाचार रोखलाजाणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रवक्ते राम शिंदेंना विचारा
विधान परिषदेच्या पाच जागांच्या निवडणूक निकालासह नाशिक मतदारसंघात भाजपने उमेदवार दिला नसल्याबाबत विचारले असता, मंत्री सावे यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला. मी मंत्री आहे व आमच्या पक्षाचे प्रवक्ते प्रा. राम शिंदे आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांनाच हे प्रश्न विचारा, असे स्पष्ट करून राजकीय भाष्य टाळले.