बाजार समिती निवडणूक : जिल्ह्यात विक्रमी अर्ज दाखल

श्रीरामपूर, राहुरीत प्रत्येकी 239 तर अकोलेत 159 उमेदवारी अर्ज, माघारीनंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार
बाजार समिती निवडणूक : जिल्ह्यात विक्रमी अर्ज दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहुरी बाजार समिती निवडणुकीत विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी तब्बल 239 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. राहात्यात 127, नेवाशात 117, संगमनेरात 109 कोपरगाव 111 तर अकोलेत 159 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज माघारीची तारीख 20 एप्रिल असल्याने या दिवशी लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

28 एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जांगासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 239 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीच्या 18 जागांसाठी एकूण 239 विक्रमी उमेद्वारी अर्ज दाखल झाल्याने या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण होणार असल्याचे चित्र आहे. काल अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने दोन्ही गटाच्या हलचालींना वेग आला होता. ही निवडणूक तनपुरे विरुद्ध विखे-कर्डीले गटात होणार असल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या 18 जागांंच्या निवडणुकीसाठी 127 उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी दाखल झाले आहेत. या निवडणुकीत व्यापारी मतदार संघातील 2 व हमाल मापाडी मतदार संघातील 1 अशा तीन जागांवर अखेर च्या दिवशी फक्त सत्ताधारी राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांचेच अर्ज असल्याने या तिन्ही जागा बिनविरोध होऊ शकतील. तर अन्यत्र सर्वच मतदार संघात लढत होण्याची चिन्हे आहेत. कोपरगाव बाजार समितीसाठी 111 अर्ज दाखल झाले आहेत.

नेवाशात 17 जागांसाठी 117 अर्ज दाखल झाले आहेत.संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकीकरीता 18 जागेसाठी काल अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 109 उमेदवारी अर्ज दाखल झाले. अकोले तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या 17 जागांसाठी तब्बल 159 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बाजार समितीच्या स्थापने पासून प्रथमतः एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणुकीत अनेक आजी- माजी संचालकांसह विविध पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असल्यामुळे निवडणुक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com