श्रीरामपूर, नेवासा वगळता अन्य बाजार समित्यांचे तळ्यात-मळ्यात

कोविड सेंटर : नगर बाजार समितीचा आधीच पुढाकार
श्रीरामपूर, नेवासा वगळता अन्य बाजार समित्यांचे तळ्यात-मळ्यात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना रूग्णसंख्या वाढत असून रुग्णांना रूग्णालय, कोविड सेंटरमध्ये बेड, ऑक्सिजन बेड मिळणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोविड उपचाराशी निगडीत विलगीकरण कक्ष, ऑक्सिजन बेड सेंटर, ऑक्सिजन मशीनचा पुरवठा अशा कोविड उपचाराशी निगडीत सुविधा उपलब्ध होण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कोविड केअर सेंटर सुरू करण्यास सहकार व पणन विभागाने मान्यता दिली आहे. त्यानूसार जिल्ह्यातील श्रीरामपूर आणि नेवासा या दोन बाजार समित्यांनी आतापर्यंत कोविड सेंटर सुरू करण्याबाबत विचारणा केली असल्याची महिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली.

राज्य सरकारच्या सहकार व पणन विभागाने बुधवारी आदेश काढले आहेत. यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मागील वर्षाच्या वाढाव्याच्या (नफा) 25 टक्के रक्कमेच्या मर्यादेत कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. यासाठी 10 लाखापर्यंतच्या भांडवली खर्चास मंजूरी देण्याचे अधिकार जिल्हा उपनिबंधक यांना देण्यात आले आहेत. 10 लाखांच्या वरील प्रस्ताव प्राप्त झाल्यास अशा प्रस्तावाच्या भांडवली खर्चास मान्यता देण्याचे अधिकार पणन संचालक यांना देण्यात आले आहेत. नगर जिल्ह्यात 14 कृषी उत्पन्न बाजार समित्या असून यातील नगरच्या बाजार समितीने आधीच कोविड सेंटर सुरू केले आहे. उर्वरितमध्ये श्रीरामपूर आणि नेवासा बाजार समित्यांकडून कोविड सेंटर सुरू करण्याबाबत विचारणा करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिली.

बाजार समित्यांना सुरू करावयाच्या कोविड सेंटरसाठी त्यांना भौतिक सुविधा ज्या मंगल कार्यालय, बेड, ऑक्सिजन आणि अन्य आवश्यक उपचाराची साधने उभी करावयाची आहेत. या सुविधांचे तालुका आरोग्य विभागामार्फत प्रामाणिकरण करणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर 10 लाखांच्या आतील प्रस्ताव जिल्हा उपननिबंधक कार्यालयास सादर केल्यानंतर त्यास तात्काळ मान्यता देण्यात येणार आहे. तर 10 लाखांपेक्षा अधिकचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत मान्यतेसाठी पणन विभागाला सादर करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील काही मोजक्या बाजार समित्यांची स्थिती समाधानकारक आहे. विशेष करून ज्या ठिकाणी कांदा पिकांचे लिलाव होतात, त्या बाजार समित्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे. उर्वरित ठिकाणी बाजार समित्या अडचणीत असून अशा परिस्थितीत ते कोविड सेंटर सुरू करण्यासाठी काय मार्ग काढणार हे पाहणे महत्तवाचे ठरणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com