दोन महिन्यांपासून मार्केट बंदमुळे कांदा उत्पादकांची अडचण

साठवणुकीची सोय नसलेले शेतकरी पावसाळ्याच्या चाहुलीने चिंतेत
दोन महिन्यांपासून मार्केट बंदमुळे कांदा उत्पादकांची अडचण

सोनई |वार्ताहर| Sonai

करोना स्थितीमुळे बाजार समितीचे लिलाव दोन ते अडीच महिन्यांपासून बंद असल्याने कांदा साठवणुकीची सोय नसलेल्या शेतकर्‍यांची मोठी अडचण झाली असून वेळेच्या अगोदर पावसाची शक्यता असल्याने अनेक शेतकरी चिंतेत असल्याचे दिसते.

सोनईसह नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कांदा पीक घेतले आहे. रान तयार करणे, महागडे बी घेवून रोप टाकणे, लागवड, खतपाणी, मशागत, काढणी, छाटणी केली. मात्र कांदा लिलाव दोन महिन्यांपासून बंद असल्याने विक्री करण्याची मोठी अडचण झाली आहे. काही शेतकर्‍यांकडे कांदाचाळ व सुरक्षा म्हणून व्यवस्था आहे मात्र अनेक शेतकर्‍यांची पंचायत झाली असून काहींचा कांदा सडू लागला आहे.

कौठा भागातील प्रगतिशील शेतकरी रावसाहेब काळे, देडगाव येथील संतोष तांबे, अजित साळुंके यांच्याशी संपर्क केला असता यावर्षी कांदा उत्पादन चांगले झाले. मात्र सध्या करोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून लिलाव दिर्घकाळापासून बंद असल्याने अनेक शेतकर्‍यांची अडचण झाली असल्याचे सांगितले. अनेकांकडे ठेवण्याची व्यवस्था नसल्याने तात्पुरता आडोसा करण्यात आला आहे. वादळ व पाऊस झाल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे असेही काळे यांनी सांगितले. मागील शेतीचा खरिपाचा विमा व अवकाळीची नुकसान भरपाई तालुक्यात अजुनही मिळाली नसल्याचे संतोष तांबे यांनी सांगितले.

सोनई भागातही यंदा अनेकांनी कांदा पीक घेतले.आता पावसाळी भुईमूग लवकरच निघेल मात्र मोंढा बंद असल्याने शेतकर्‍यांची अडचण निर्माण झाली आहे. अनेकांची बियाणामध्ये फसवणूक झाली असून लावला लाल गावरान कांदा आणि उगवला पांढरा कांदा असे चित्र असल्याचे बापूसाहेब बारगळ यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com