सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

बाजार चाललाय मस्त प्रशासन मात्र सुस्त नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील आठवडा बाजाराचे हे चित्र असून

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे करोनासारख्या भयंकर आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे .

जिल्हाधिकार्यांनी मागील आठवड्यापासून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संपूर्ण नेवासा तालुक्यात बाजार बंद असताना सलाबतपूर गावात नियमांचं उल्लंघन होताना दिसतंय.

केवळ बाजार भरण्याचे ठिकाण बदललेले दिसते. यामुळे व्यापार्यांना पैसा आणि नागरिकांना बाजार जिवापेक्षा मोठा वाटतो का? हाच कुतुहलाचा विषय बनला आहे. एकीकडे सरकार कडक निर्बंध लावण्याची भाषा करत आहे. तर दुसरीकडं याबाबत प्रशासकिय यंत्रणाच गाफिल दिसत आहे.

सलाबतपूरसह परिसरात सध्या करोनाने शिरकाव केला आहे. काल सलाबतपूर येथेही अनेक महिन्यांनंतर करोनाचे संक्रमित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अशातच सर्वांनी जबाबदारी ओळखून वागणे गरजेचे असताना शासकिय नियमांची पायमल्ली करणं कितपत योग्य आहे? असा प्रश्न पडतो.

गेल्या दोन आठवड्यांपासून गरजेच्या नावाखाली दिवसभर बाजार चालतो आणि त्याकडं स्थानिक प्रशासन सोयिस्करपणे दुर्लक्ष करतं. त्यामुळे प्रशासनाला याचं गांभीर्य आहे की नाही? असं सुज्ञ नागरीक विचारू लागले आहेत. बाजारात व्यापार्यांसह नागरिक मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स पाळताना दिसत नाहीत असे असेल तर खरंच करोनाचा प्रादुर्भाव रोखला जाईल का? हाच प्रश्न आहे.

सध्या सलाबतपूर, गोगलगाव, गळनिंब, शिरसगाव आदी गावांमध्ये करोना संक्रमित रुग्ण आहेत. या रुग्णांच्या संपर्कातील आणखी किती रुग्ण असतील हे सांगणं कठिणच आहे. अशातच नागरिकांचा बेशिस्तपणा आणि प्रशासनाच्या बेजबाबदारपणाची किती किंमत मोजावी लागेल हे सांगणंही कठिणच आहे.