झेंडूच्या भावात उसळी अन् घसरण

झेंडूच्या भावात उसळी अन् घसरण

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

दसर्‍याला फेकून देण्याची वेळ आलेल्या झेंडूने काल दीपावलीच्या दिवशी चांगलाच भाव खाल्ला! आवक कमी आणि मागणी जास्त या प्रकाराने झेंडू भाव खावून गेला.

दीपावली म्हटले की, आनंदाचा सण! स्वच्छता, रंगरंगोटी, रांगोळीची पखरण, आणि देवदेवतांना हार पुजेसाठी फुले तसेच घराला, दुकानांना, वाहनांना झेंडूचे हार करून बांधले जातात. शिवाय पुजेलाही झेंडूची फुले लागतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंंबाला झेंडूची फुले या सणाला लागतातच. दसर्‍याच्या वेळी झेंडूची गरज ओळखून व्यापार्‍यांनी झेंडूची पोती पुणे , नारायणगाव भागातून विक्रीसाठी आणली होती. त्यावेळी झेंडूची आवक जास्त झाल्याने भाव मात्र गडगडले होते. व्यापारी आणि शेतकरी हे फुले विक्रीस आणतात. फुले शिल्लक राहिल्याने फेकून देण्याची वेळ या दोन्ही घटकांवर आली होती.

दसर्‍याला फुले फेकून देण्याची वेळ आली होती, आता ही तशीच स्थिती असल्याने व्यापार्‍यांनी फुले कमी प्रमाणात बाजारात आणली. शेतकर्‍यांनी ही बाजारात आणली. मात्र आवक कमी झाली. काल दीपावलीच्या दिवशी सकाळी फुलाला 40 ते 50 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. मात्र दुपारी 3 वाजेनंतर झेंडू विक्रेत्यांकडे फुले कमी दिसू लागल्याने 100 ते 150 रुपयांनी ग्राहकांनी ती खरेदी केली. त्यामुळे दुपारनंतर झेंडूने चांगलाच भाव खाल्ला! त्यातच व्यापारी कमी आणि शेतकरी जास्त असे चित्र दिसून येत होते. त्यामुळे शेतकर्‍यांना वाढलेल्या भावाचा फायदा झाला.

दरम्यान पाचच्या सुमारास भाव वाढल्याचे दिसून आल्याने शेतकरी वर्गाने शेतातील फुले पुन्हा तोडून विक्रीस आणली. त्यात उमलण्याच्या बेतात असलेली फुले आणली. त्यामुळे आवक वाढल्याने शंभरी पार केलेले फुलांचे भाव 60 ते 70 रुपयांवर आले.

झेंडूच्या फुलाला दसरा, दीपावलीला विशेष महत्त्व असते. दसरा सणाला आवक वाढल्याने भाव कमी झाले. मात्र दीपावलीला आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने शेतकरी वर्गाला भाव मिळाले. करोनात फूल उत्पादकांना काहीसा आधार मिळाला. शेतकरी वर्गाला भावच मिळायला हवा !

- मच्छिंद्र चोळके, माऊली डेव्हलपर्स, अस्तगाव.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com