
टाकळीमिया |वार्ताहर| Takalimiya
शिर्डी लोकसभा व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात येणार्या राहुरी तालुक्यातील 32 गावच्या विकास कामांच्या विकासासाठी 70 कोटींच्या निधीतून विविध रस्ते नदीवरील पूल व अनेक गावांतील इतर विकास कामे मंजुरीची यादी खासदार व आमदार यांनी वर्तमानपत्रातून दिली होती. दोघेही हा निधी आणल्याचे सांगत होते. मात्र या श्रेयवादात मार्च महिना संपला तरी यातील बर्याच कामांना सुरूवात देखील झाली नसल्याने या 32 गावांतील जनतेचा भ्रमनिरास झाल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान खा.सदाशिव लोखंडे यांची ही दुसरी तर आ.लहु कानडे यांची ही पहिली इनिंग आहे. मात्र, खासदारांनी या गावांसाठी कुठलीच भरीव कामे केली नाहीत.आमदारांची परिस्थितीही तशीच असल्याचे लोक बोलत आहेत. आता गेल्या महिन्यापूर्वी खा. लोखंडे यांनी या भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या देवळाली प्रवरा-टाकळीमिया-मुसळवाडी रस्ता, लाख-टाकळीमिया रस्ता व 32 गावांतील विविध भागातील उपरस्ते व प्रवरा नदीवरील लाख-कान्हेगाव जोडणारा पूल या कामांसाठी 70 कोटींच्या निधीची वर्तमानपत्रातून माहीती दिली होती तसेच आमदार कानडे यांनीही याच कामासाठी निधी आणला असून ही कामे करणार असल्याचा दावा केला होता. मात्र, दोघांनीही या घोषणा करुन बरेच दिवस होत आले आहेत. तरी देखील या कामांची कुठेही हालचाल दिसत नसल्याने हे मृगजळ तर नाही ना? अशी भावना लोकांची होताना दिसत आहे.
राहुरी व श्रीरामपूर तालुक्याला जवळच्या मार्गाने जोडणारा प्रवरा नदीवरील पुल, या 32 गावातील रस्ते, अनेक गावांत प्रलंबीत असलेल्या मुलभूत सुविधा ही कामे रखडलेच आहेत. यांनी या 32 गावांतील होणार्या कामांसाठी 70 कोटींच्या खर्चाचा तपशील वर्तमानपत्रातून जाहीर केला. ते वाचून आता आपले रस्ते होतील, पूल होईल, इतर विकामे होतील या आशेवर नागरीक होते. मात्र मार्च महिना संपला तरी या कामांबाबत कुठलीही हालचाल होताना दिसत नसल्याने लोकांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्याचप्रमाणे राहुरी तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला टाकळीमिया-राहुरी रस्ता असुन या रस्त्याचे टाकळीमिया ते वाघाचा आखाडा पर्यंत आ. लहु कानडे यांच्या निधीतून काम झाले.
परंतु, वाघाचा आखाडा ते राहुरी स्टेशनपर्यंत साधारण 4 किलोमीटर रस्ता हा राहुरी-पाथर्डी मतदार संघात येत असल्याने त्या मतदार संघाचे आमदार व माजी मंत्री व खासदार यांनी दुसरीकडे कोटींच्या कामांची उड्डाणे घेत असून या छोट्याशा कामाकडे कुणालाच लक्ष देण्याची गरज वाटत नाही. वाघाचा आखाडा ते राहुरी रेल्वे स्टेशन पर्यंतच्या रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. रस्यावर मोठमोठ्या कपारी पडल्या असून रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याने आतापर्यंत या रस्त्यावर 7 ते 8 जणांचे बळी गेले आहेत. एकंदरितच या 32 गावांबाबत सर्वच आमदार खासदारांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.