मराठवाडा वॉटर ग्रीडचे लोण नगर, नाशिक पर्यंत पोहचणार का ?

मराठवाडा वॉटर ग्रीडचे लोण नगर, नाशिक पर्यंत पोहचणार का ?

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

मराठवाड्याच्या पाणी टंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना करावी, या भुमिकेतून मराठवाडा वॉटर ग्रीड पाईपलाईन ही संकल्पना पुढे आली. या योजनेला काल तत्वतः मान्यता देण्यात आली. त्यामुळे भविष्यात मराठवाड्याच्या या वॉटर ग्रीड प्रकल्पाचे घोडे नगर, नाशिक पर्यंत पोहचणार का? या प्रश्नाभोवती आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठवाड्यातील तीव्र पाणी टंचाई पाहाता, या विभागातील 11 धरणांना ग्रीड द्वारे जोडले जाणार आहे. यासाठी दि. 6 डिसेंबर 2016 (शासन निर्णय क्र. ग्रापाधो-1116/प्र. क्र. 122/पापु-07 दि. 6 डिसेंबर 2016) रोजी मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन होऊन दि. 22 मे 2017 रोजी समितीच्या बैठकीत मराठवाड्यातील धरणे एकमेकांना पाईपलाईनने जोडण्याचा निर्णय झाला. तसेच आवश्यकता भासल्यास नजीकच्या प्रादेशिक विभागातून म्हणजे नगर नाशिक मधील धरणातील पाण्याचाही विचार व्हावा असे ठरले. हीयोजना पिण्याचे आणि औद्योगिक यासाठी 18 टीएमसी पाण्याचे नियोजन करण्याचे मुळ उद्दीष्ट ठेऊन संकल्पीत केली आहे.

मराठवाडा विभागात पाणी कमी असल्याने नगर नाशिक मधून समन्यायी वाटपाचे पाणी, पाईपलाईनने आणण्याचा पर्याय तपासणेचा समावेश, या ग्रीडच्या व्याप्तिच्या मुद्दा क्रमांक 7 मध्ये नमुद आहे. तसेच नगर, नाशिक धरणातून जायकवाडीसाठी थेट पाईपलाईन झाल्यास नदीतून वहनव्यय कमी होईल, असे याचे समर्थन केले जाते. परंतू धरणातून अशी थेट सुविधा उपलब्ध झाल्यास वर्षभरासाठी हा विषय कायमस्वरुपी चालू राहु शकतो. सध्या फक्त पिणे आणि औद्योगिकच्या पाण्याचा विचार असला तरी, सर्वत्र पाईपलाईनने पाणी पुरवठा करण्याच्या शासन धोरणामुळे भविष्यात सिंचनाच्या पाण्याचाही त्यात समावेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जायकवाडीच्या फुगवट्यातून होत असलेल्या अनधिकृत बेसुमार पाणी उपश्यामुळे जायकवाडीच्या पाणी वापर कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होत असतो. अशा परिस्थितीत वरील धरणातून सहजसुलभपणे पाणी येण्याची सुविधा निर्माण झाली तर, त्याची झळ नगर नाशिक मधील जनतेला निश्चितपणे बसेल.

यासंदर्भात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांचेकडे याचिका क्र. 12/2018 आणि याचिका क्र. 15/2018 अन्वये दाद मागितली होती. त्या याचिकेला शासनाने दिलेल्या उत्तरात नगर नाशिक जिल्हे या ग्रीडला जोडले जाणार नाही, असे ठोसपणे कुठेही नमुद केलेले नाही. उलट हे काम करणार्‍या इस्राइलच्या, मेसर्स मेकोरोट कंपनीच्या बरोबर झालेल्या करारातील मुद्दा क्रमांक 4(ब) मध्ये आवश्यकता असेल तर जायकवाडीच्या वरील धरणातून पाणी उपलब्ध होण्याबाबतची शक्यता तपासण्यास सांगितले आहे.

मराठवाड्यातील सरासरी पाऊस 750 मीमी असून नगर नाशिकमध्ये घाटमाथा सोडल्यास पर्जन्यछायेत असलेला जवळपास 80 टक्के भागाची सरासरी 450 मीमी आहे. या भागाला सुद्धा तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे मराठवाड्यासारखीच नगर नाशिक जिल्ह्यासाठी स्वतंत्र वॉटर ग्रीड (पाईपलाईन) होणे सुध्दा गरजेचे आहे.

सध्या हे वॉटर ग्रीड फक्त मराठवाडा विभागपुरतेच मर्यादित असल्याची माहिती आहे. परंतु या वॉटर ग्रीडची सुरवात जरी मराठवाड्यात झाली तरी तीचा शेवट नगर नाशिकमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. कारण तसे होणार नाही, असे ठामपणे कुणी सांगत नाही. त्यामुळे यासंदर्भातील सद्यपरिस्थितीबाबत नगर, नाशिक मधील लोकप्रतिनिधींनी जागरुक राहणे गरजेचे आहे. मुळात दि. 6 डिसेंबर 2016 चा शासन निर्णय घेताना सुद्धा, नगर नाशिक जिल्ह़्यातील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नव्हते. त्यामुळे याबाबत सार्वत्रिक जागरुकता होणे सर्वांच्याच दृष्टीने हितकारक राहील.

मराठवाडा वॉटर ग्रीडची सुरवात मराठवाड्यात झाली तरी, तिचा शेवट नगर, नाशिक नाशिक जिल्ह्यात होण्याचीच दाट शक्यता आहे. कारण या वॉटर ग्रीडला नगर, नाशिक मधील धरणे जोडली जाणार नाहीत, असे ठोसपणे कुठेही नमुद केलेले नाही.

- उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com