आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज - खा. डॉ. विखे

शिर्डी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणास भेट
आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज - खा. डॉ. विखे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर कोणी काही बोलले तरी त्याचा विपर्यास होतो हे अत्यंत दुर्दैवी आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पक्षीय जोडे बाजूला ठेवून एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे मत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

खा. सुजय विखे पाटील यांनी राहाता व शिर्डी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबाच असल्याचे नमूद करून खा. विखे पाटील म्हणाले,आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन आता नेत्यांची घर जाळण्यापर्यंत येऊन ठेपणे हे योग्य नाही. आरक्षणाच्या प्रश्नावर कोणत्याही लोकप्रतिनीधीने व्यक्त केलेल्या प्रतिक्रयेचा विपर्यास केला जाणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सर्वच लोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. परंतु आज जाहीर भाष्य करायला सरपंच पदापासून ते सर्वच पदावर असलेले नेते बोलायला पुढे येत नसल्याकडे लक्ष वेधून या प्रश्नावर प्रतिक्रीया व्यक्त करताना कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे.

यावेळी राहाता तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षण प्रश्नांसाठी आमरण उपोषणास बसलेले सचिन चौगुले, अनिल बोठे, रवींद्र गोंदकर, नितीन कोते, प्रशांत राहणे, कानिफ गुंजाळ, प्रकाश गोंदकर यांच्याबरोबर खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी चर्चा केली. यावेळी ज्ञानेश्वर गोंदकर, विजय काळे, ताराचंद कोते, मनसे दत्तात्रेय कोते, सुजित गोंदकर, गणेश कोते, नितीन कोते, आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच या उपोषणास कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, नितीन कोल्हे, विजय दंडवते, भगवान टिळेकर, संपत हिंगे आदींसह नागरिकांनी चौथ्या दिवशी सुरू असलेल्या आमरण उपोषणास भेट दिली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com