मराठा समाज आरक्षण आंदोलन पेटले; आज राहाता तालुका बंद

मराठा समाज आरक्षण आंदोलन पेटले; आज राहाता तालुका बंद

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणास पाठिंब्यासाठी व सरकारच्या निषेधार्थ राहाता तालुक्यात मराठा समाजाच्या वतीने आज सोमवार दि. 30 रोजी बंद पाळण्यात येणार आहे. सोशल मीडियावर या स्वरुपाचे आवाहन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठा आरक्षणासाठी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे या आगोदर 17 दिवस अमरण उपोषण केले. त्यानंतर मुख्यमंत्री व मंत्रीमंडळातील सदस्य यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आरक्षणासाठी 30 दिवसांची मुदत दिली होती. जरांगे पाटील यांनी 40 दिवसांची मुदत दिली होती. सरकारने पुरावे गोळा करण्याचे काम चालू केले. त्या दरम्यान मनोज जरांगे यांनी 29 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत त्यांनी राज्यभरात मराठा समाजाची संवाद यात्रा काढून समाजाला आरक्षणा संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच इतर ओबीसी समाजाला सुध्दा वास्तव आरक्षणाची माहिती दिली. त्यानंतर सरकारला दिलेला 40 दिवसांचा अल्टीमेटम दि. 24 ऑक्टोबर रोजी संपल्याने त्यांनी पुन्हा पाणी त्याग, अन्नत्याग अमरण उपोषण सुरू केले.

या दरम्यान त्यांनी सरकारच्या कुठल्याही प्रशासनाच्या यंत्रणेशी संवाद साधणार नसून आरक्षणाचा निर्णय तातडीने सोडवावा यासाठी उपोषणास बसले. काल या उपोषणाचा पाचवा दिवस होता. त्यांची तब्येत अतिशय खालावलेली असल्याने तसेच जिल्ह्यातील तसेच तालुका पातळीवरील गावोगावी साखळी उपोषणाच्या माध्यमातून जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे, परंतु काल रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसून येत असलेली खालावलेली प्रकृती यामुळे मराठा समाज बांधवांच्या भावना तीव्र झाल्याने सकल मराठा समाजाच्यावतीने गावोगावी आज सोमवार दि. 30 रोजी दिवसभर बंद पुकारण्यात आला आहे. मराठा समाजातील आमदार, खासदार तसेच सत्ताधार्‍यांवर मराठा समाजाचा रोष वाढत असून त्यांना गाव बंदी करण्यात आली आहे.

दरम्यान राहाता तालुक्यातील शिर्डी, कोल्हार येथे साखळी उपोषण सुरू असून आजुबाजूच्या खेड्यातील समाज बांधव त्यांना पाठिंबा देण्यासाठी येत आहेत. राहाता शहरातही आज साखळी उपोषण करण्यात येणार आहे.

दरम्यान अस्तगाव येथील तरुणांनीही अस्तगाव बंदचे आवाहन केले आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 8 पर्यंत बंद पाळण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com