तुरळक फेर्‍या वगळता एसटी सेवा ठप्प

खबरदारी म्हणून महामंडळाचा निर्णय || विद्यार्थी, प्रवाशांना खासगीचा आधार
तुरळक फेर्‍या वगळता एसटी सेवा ठप्प

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी जाळपोळ, तोडफोडीच्या घटना होत असल्याने खबरदारी म्हणून एसटी महामंडळाने नगर जिल्ह्यातील बहुतांश बस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे नगरमध्ये मंगळवारी 80 टक्के फेर्‍या बंद होत्या. याचा फटका महाविद्यालय मुले, विद्यार्थ्यांसह प्रवाशांना बसला. ऐनवळी त्यांना खासगी वाहतूक सेवाचा आधार घ्यावा लागला.

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा तसेच राज्यातील काही भागांत एसटीवर दगडफेक करण्यात आली. तर काही ठिकाणी महामार्गावर आंदोलन सुरू असल्याने एसटीच्या फेर्‍या करण्यात अडचणी येत आहेत. सोमवारी केवळ बीड जिल्ह्यात जाणार्‍या फेर्‍या रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु, त्यानंतरही अनेक ठिकाणी तोडफोड झाल्याने खबरदारी म्हणून एसटीच्या अहमदनगर विभागीय कार्यालयाने मंगळवारी बहुतांश ठिकाणच्या फेर्‍या रद्द केल्या. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. नगर जिल्ह्यात एसटी महामंडळाचे 11 आगार आहेत. या सर्व आगारांच्या लांब पल्ल्याच्या बस मंगळवारी बंद होत्या. केवळ ग्रामीण भागातील काही फेर्‍या सुरू होत्या. आंदोलनाचा अंदाज घेऊन आगारप्रमुख बस सोडण्याचा निर्णय घेत होते.

सध्या विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे विविध शाळांत जाणारे तसेच ग्रामीण भागातून शहरात येणार्‍या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे बस अभावी हाल झाले. काही ठिकाणी बस सुरू होत्या, असे प्रशासनाचे म्हणणे असले, तरी अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे हाल झाले. अनेक विद्यार्थी दुपारी पेपर सुटल्यानंतर बसची वाट पाहत होते. याशिवाय दिवाळी खरेदीसाठी ग्रामीण भागातून शहरात येणार्‍या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. नगरमधील माळीवाडा, पुणे आणि तारकपूर एसटी महामंडळाचे बसस्थानक सोसाड पडले होते. तर काही ठिकाणी विद्यार्थी, प्रवासी बसची वाट पाहत होते.

तारकपूरमध्ये गाड्यांना आश्रय

शहरातील तीन बसस्थानकांपैकी माळीवाडा व स्वस्तिक बसस्थानकात एकही बस उभी नव्हती. अधूनमधून एखादी बस सुरू होती. याचा फायदा घेत स्थानकात अनेक खासगी वाहने प्रवासी भरत होते. शिवाय बंद असलेल्या अनेक बस तारकपूर बसस्थानकात उभ्या केलेल्या होत्या. याठिकाणी बसेस सुरक्षित असल्याने नगर आणि परिसारात एसटी बसेस याठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लांब पल्ल्याच्या काही फेर्‍या बंद करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असल्याने त्या बस सुरू आहेत. बीड, छत्रपती संभाजीनगर तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जाणार्‍या बसवर परिणाम झाला आहे. आंदोलनाची स्थिती पाहून बस सोडण्याबाबत आगार प्रमुखांना सांगण्यात आले आहे. पुढील आदेश आल्यानंतर एसटी महामंडळ परिस्थिती पाहून सेवा सुरू करण्याचा निर्णय घेणार आहे.

- मुकुंद नगराळे, प्रभारी विभाग नियंत्रक, नगर

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com