मराठा आंदोलकांना पोलिसांनी आधीच रोखले
सार्वमत

मराठा आंदोलकांना पोलिसांनी आधीच रोखले

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कायगांव पुलावरील आंदोलन

Nilesh Jadhav

देवगड फाटा | वार्ताहर | Devgad Fhata

मराठा आरक्षण आंदोलनामध्ये सर्वप्रथम हुतात्मा झालेल्या स्व. काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मराठा ठोक मोर्चाच्या maratha morcha काही पदाधिकाऱ्यांनी आज कायगाव येथील गोदावरी पुलावर बलिदान ते आत्मबलिदान आंदोलनात आंदोलकांना आंदोलन स्थळापासून दहा कि.मी. अंतरावरच रोखून पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात येउन सोडण्यात आले असून तहसीलदारांनी सरकारच्यावतीने मागण्यांसंदर्भात ३० तारखेला मंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शांततेत संपन्न झाले.

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने आंदोलकांना कायगांव येथील स्व. काकासाहेब शिंदे स्मृतिस्थळापासून दहा कि.मी. अंतरावर भेंडाळा फाटा येथे रोखून धरले होते व कायगावला जाणाऱे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे आंदोलकांनी भेंडाळा फाटा येथे महामार्गावर ठिय्या आंदोलन करून मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा दिला.

आंदोलकांच्या मागण्या

यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले त्यामध्ये कायगाव येथे स्व. काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकासाठी गोदावरी पुलानजीक जागा उपलब्ध करून देउन सुशोभिकरण करावे, कोपर्डी बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशी देण्यात यावी, आरक्षण आंदोलनात मृत्यू पावले ४२ आंदोलकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देउन शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी आर्थिक तरतूद करणे, मराठा समाजाच्या विद्यार्थासाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह स्थापन करणे, सारथी संस्थेचे उपविभागीय कार्यालयात मराठवाड्यात सुरू करावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला ५०० कोटी निधी द्यावा व मराठा आंदोलकांवरील १३ हजार ७०० गुन्हे मागे घेण्यात यावे या मागण्या करण्यात आल्या.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठकीचे आश्वासन

यावेळी तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी सरकारच्यावतीने आंदोलकांना दि. ३० जुलै रोजी नगरविकास मंत्री व मराठा आरक्षणासंदर्भातील विधीमंडळ उपसमितीचे सदस्य एकनाथ शिंदे यांचेसोबत आंदोलकांची बैठक घडवून आणून मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यासाठी बोलावण्याचे लेखी आश्वासन दिले. तरीही आंदोलक त्यांच्या निर्णयावर ठाम असल्यावरून पोलिसांनी सर्व आंदोलकांना पोलिसांच्या वाहनांमध्ये बसवून सोडून दिले.

कुटुंबियांच्यावतीने श्रद्धांजली

याप्रसंगी प्रशासनाच्यावतीने शिंदे कुटुंबियांना स्मृतीस्थळाला भेट देऊन श्रद्धांजली वाहण्यास परवानगी दिली होती त्यानुसार दुपारी एक वाजेच्या सुमारास स्व. काकासाहेब शिंदे यांचे आई, वडिल, भाऊ, बहिण व चुलत्यांसह एकूण सहा जणांनी काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहिली.

कडक पोलिस बंदोबस्त

आजच्या आंदोलनाच्या बंदोबस्तासाठी जिल्हा ग्रामीणच्या पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह अप्पर पोलिस अधिक्षक, तीन डीवायएसपीसह दोनशेपेक्षा अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचा कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Deshdoot
www.deshdoot.com