मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन शांततेत
सार्वमत

मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन शांततेत

पोलिसांनी भेंडाळा फाटा येथे रोखले; आंदोलकांनी तेथेच केले ठिय्या आंदोलन

Arvind Arkhade

देवगडफाटा|वार्ताहर|Devgad phata

मराठा आरक्षण आंदोलनामध्ये सर्वप्रथम हुतात्मा झालेल्या स्व. काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या काही पदाधिकार्‍यांनी काल 23 जुलै रोजी कायगाव येथील गोदावरी पुलावर आयोजित केलेले आंदोलन पोलिसांनी दहा किलोमीटर अलिकडेच (भेंडाळा फाटा) रोखल्याने पदाधिकार्‍यांनी भेंडाळाफाटा येथेच महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. तहसीलदारांनी सरकारच्यावतीने मागण्यांसंदर्भात 30 तारखेला मंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शांततेत पार पडले.

आंदोलकांच्या मागण्या..

यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये कायगाव येथे स्व. काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकासाठी गोदावरी पुलानजीक जागा उपलब्ध करून देऊन सुशोभिकरण करावे, कोपर्डी बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशी देण्यात यावी, आरक्षण आंदोलनात मृत्यू पावलेल्या 42 आंदोलकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी आर्थिक तरतूद करणे, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह स्थापन करणे, सारथी संस्थेचे उपविभागीय कार्यालय मराठवाड्यात सुरू करावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला 500 कोटी निधी द्यावा व मराठा आंदोलकांवरील 13 हजार 700 गुन्हे मागे घेण्यात यावेत, या मागण्या करण्यात आल्या.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठकीचे आश्वासन

यावेळी गंगापूरचे तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी सरकारच्यावतीने आंदोलकांना दि. 30 जुलै रोजी नगरविकास मंत्री व मराठा आरक्षणासंदर्भातील विधिमंडळ उपसमितीचे सदस्य एकनाथ शिंदे यांचेसोबत आंदोलकांची बैठक घडवून आणून मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यासाठी बोलावण्याचे लेखी आश्वासन दिले. तरीही आंदोलक त्यांच्या निर्णयावर ठाम असल्यावरून पोलिसांनी सर्व आंदोलकांना पोलिसांच्या वाहनांमध्ये बसवून सोडून दिले.

कुटुंबियांच्यावतीने श्रद्धांजली..

याप्रसंगी प्रशासनाच्यावतीने शिंदे कुटुंबियांना स्मृतीस्थळाला भेट देऊन श्रद्धांजली वाहण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार दुपारी एक वाजेच्या सुमारास स्व. काकासाहेब शिंदे यांचे आई, वडिल, भाऊ, बहिण चुलत्यांसह एकूण सहा जणांनी काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहिली.

कडक पोलीस बंदोबस्त

आजच्या आंदोलनाच्या बंदोबस्तासाठी जिल्हा ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक, तीन डीवायएसपीसह दोनशेपेक्षा अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Deshdoot
www.deshdoot.com