खासगी हॉस्पिटलमध्ये लस नसल्याने अनेकांना दुसरा डोस मिळेना

खासगी हॉस्पिटलमध्ये लस नसल्याने अनेकांना दुसरा डोस मिळेना

अहमदनगर (प्रतिनिधी) - महापालिकेच्या लसीकरण केंद्रावरील गर्दीला घाबरून साडेहजार नगरकरांनी पैसे मोजून खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीची पहिला डोस घेतला. आता लस टंचाई निर्माण झाल्याने शासनाने खासगी हॉस्पिटलला लस देणेच बंद केले आहे. त्यामुळे 6 हजार 410 नगरकरांना लसीचा दुसरा डोस खासगी हॉस्पिटलमध्ये मिळेना. महापालिकेत नोंदणी नसल्याने इकडेही लस मिळेना. दुसर्‍या डोसची लसहुल बसल्याने 6 हजार 410 नगरकरांच्या काळजीत भर पडली आहे.

राज्य शासनाने महापालिकेसोबतच निवडक खासगी हॉस्पिटलमध्येही सशुल्क कोरोना लस उपलब्ध करून दिली. कोरोनावर लसमात्रा आल्यानंतर ती घेण्यासाठी महापालिकेच्या केंद्रावर गर्दी उसळली. या गर्दीतून कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने हा धोका वाढला. गर्दीत उभे राहून लस घेतेवेळी कोरोनाचा वानोळा आला तर? या भितीपोटी 6 हजार 491 नगरकरांनी खासगी हॉस्पिटलमध्ये जावून पैसे खर्च करत लस टोचून घेतली. त्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर तसेच वृध्द आणि 45 ते 60 वयोगटातील नगरकरांचा समावेश आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये लस असताना 81 नगरकरांना लसीचा दुसरा डोस मिळाला. आता मात्र राज्यात लस टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने खासगी हॉस्पिटलमध्ये लस देणेच बंद केले आहे. त्यामुळे राहिलेल्या 6 हजार 410 नगरकरांना लसीचा दुसरा डोस मिळेना. महापालिकेच्या केंद्रात जावे तर तेथे ऑनलाईन नोंदच नाही. खासगी हॉस्पिटलमध्ये पैसे मोजून लस घेणार्‍या श्रीमंत नगरकरांना आता लसहुल बसल्याने त्यांची काळजी वाढली आहे. अनेक जण खासगी हॉस्पिटलमध्ये जावून लस कधी मिळणार? अशी चौकशी करत आहेत. शासनाकडून उपलब्ध होताच फोन करून बोलावून घेऊन लस देऊ असे त्यांना समजावून सांगितले जात आहे.

..........................................................

महापालिकेच्या केंद्रात 22 हजार बाकी

नगर महापालिकेने आतापर्यंत 35 हजार 279 नगरकरांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला आहे. त्यातील 12 हजार 914 जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला. अजूनही 22 हजार 365 नगरकरांना दुसरा डोस देणे बाकी आहे. महापालिकेने केवळ दुसर्‍या डोसला प्राधान्य दिले आहे, मात्र रोज सातशे-आठशेच लसीकरण होत असल्याने पहिला डोस घेतलेल्यांचा दुसरा डोस पूर्ण व्हायला अजून 22 दिवस लागतील असे चित्र दिसते आहे. लसीकरणाचा वेग वाढला तरच हा दुसरा डोस पूर्ण होऊन 45 ते 60 आणि त्यापुढील नगरकरांना लसीचा पहिला डोस मिळणार आहे.

दुसरा डोस राहिलेल्यांमध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, 45 ते 60 आणि ज्येष्ठांचाही समावेश आहे. साडेतीन हजार आरोग्य कर्मचारी, 3 हजार फ्रंटलाईन वर्कर, सव्वाआठ हजार 45 ते 60 वयोगटातील आणि साडेसात हजार ज्येष्ठ नागरिकांना लसीचा दुसरा डोस घेणे बाकी आहे. महापालिकेला कोविशिल्ड लसीचे 10 हजार डोस आले आहेत. मात्र दुसरा डोस घेणे बाकी असलेले आणि मिळालेले डोस याचा ताळमेळच जुळत नाही. त्यामुळे महापालिकेच्या केंद्रात लस घेतलेल्या नगरकरांनाही दुसर्‍या लसीची चिंता कायम आहे.

यंगस्टारचा विचारच नाही

केंद्रा शासनाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने 18 ते 44 वयोगटातील यंगस्टारांना कोरोना लस मोफत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेच्या सातही केंद्रात ही मोहीम राबविली गेली. 1 ते 10 मे या काळात 10 हजार 612 यंगस्टारांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर लस टंचाई निर्माण झाली. त्यामुळे यंगिस्तानला पहिला डोस देणे बंद करण्यात आले. लस टंचाई असल्याने पहिला डोस घेतलेल्या यंगिस्तानला दुसरा डोस वेळेवर मिळेल का? असा प्रश्‍न भेडसावत आहे. शासनाने या यंगिस्तानचा विचारच केलेला दिसत नसल्याचा आरोप केला जातोय.

खासगीतील लसीकरण

पहिला डोस 6491

दुसरा डोस 0081

डोस राहिलेले

आरोग्य कर्मचारी 177

फ्रंटलाईन वर्कर 152

45 ते 60 वयोगट 2381

ज्येष्ठ नागरिक 3700

मनपाचे लसीकरण

पहिला डोस 35279

दुसरा डोस 12914

डोस राहिलेले

आरोग्य कर्मचारी 3534

फ्रंटलाईन वर्कर 3012

45 ते 60 वयोगट 8252

ज्येष्ठ नागरिक 7567

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com