मानोरी-केंदळ पुलाचे बंद झालेले काम पुन्हा सुरू करण्याची मागणी

मानोरी-केंदळ पुलाचे बंद झालेले काम पुन्हा सुरू  करण्याची मागणी

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

मानोरी-केंदळ या दोन गावांना जोडणार्‍या मुळा नदीवरील बंधार्‍या शेजारील पुलाचे काम सुरू होऊन बंद पडल्याने या दोन गावांचा दळवळणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पुलाचे काम सुरू व्हावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील मुळानदी पात्रावरील कोल्हापूर पध्दतीने बांधण्यात आलेला मानोरी बंधार्‍या शेजारील पूल गेल्या अनेक दिवसांपासून कोसळला आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या पुलासंदर्भात माजी खासदार प्रसाद तनपुरे आणि माजी राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांनी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडेे वेळोवेळी पाठपुरावा करून या पुलासाठी मुळा पाटबंधारे विभागाकडून 22 लक्ष रुपये निधी मंजूर केला होता.

त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली होती परंतु, काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे काही दिवस काम बंद झाले होते. त्यानंतर पुन्हा माजी खा. तनपुरे यांनी जलसंपदा विभागाकडे सदर कामासाठी वाढीव निधीची मागणी केली होती. या कामाच्या सर्व बाबी प्रगतीपथावर असतानाच आघाडी सरकार कोसळले. राज्यात शिंदे- फडणविस सरकार सत्तेत आले. त्यानंतर मात्र, या पुलाच्या कामाच्या संदर्भात निधी उपलब्ध होंऊ शकला नसल्याचे समजते. त्यामुळे सुरू झालेले काम बंदच पडल्याने लाभधारक ग्रामस्थांमध्ये निराशा परसरली आहे.

मानोरी, केंदळ खुर्द, केंदळ बुद्रुक, पिंप्री वळण, चंडकापूर, आरडगाव ब्राम्हणी, बेल्हेकरवाडी आदी गावांतील शेतकरी, प्रवासी, शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थी, दूध उत्पादक शेतकरी, वाहन चालक या सर्वांना मोठ्या मुश्कीलीचा सामाना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने पुलाची उंची वाढविणे गरजेचे आहे, अशी मागणी येथील प्रवासी वर्गातून केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com