मानोरी आरोग्य उपकेंद्राच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

नवीन इमारत उभारणीची मागणी
मानोरी आरोग्य उपकेंद्राच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यातील मानोरी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची बंद व भग्न इमारत अत्यवस्थेत असून या इमारतीच्या चहुबाजूंनी काटेरी झुडूपे वाढल्याने मोठ्या प्रमाणात धोकादायक बनली आहे. या इमारतीची दुरुस्ती न करता नवीन बांधकाम करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मानोरी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत बंद असून काही ठिकाणी स्लॅब देखील कोसळला आहे. त्यामुळे ही इमारत वापरण्यायोग्य राहिलेली नाही. इमारतीच्या चोहोबाजूंनी पाणी साचून झाडीझुडूपे तसेच गवताळ परिसर निर्माण झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या इमारतीच्या भिंतीची पडझड झाली असल्यामुळे इमारत धोकादायक बनली आहे.

सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात आरोग्य उपकेंद्र इमारतीची नितांत आवश्यकता आहे. या इमारतीसाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव यांच्याकडून पाठपुरावा केला जात आहे.

या आरोग्य उपकेंद्राचे कामकाज इतर पर्यायी ठिकाणाहून केले जात आहे. येथील रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागतो तर रात्रीच्या वेळी आजारी पडलेले रुग्ण यांना सकाळपर्यंत ताटकळत थांबावे लागते. तरी या आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे काम लवकरात लवकर व्हावे, अशी वेळोवेळी मागणी येथील नागरिकांनी केली होती. तरीही अद्याप मुहूर्त लागत नसल्याने उपकेंद्र इमारतीची दुरुस्ती न करता नवीन इमारत उभारण्यात यावी, अशी मागणी भाऊसाहेब तनपुरे, सोपान खामकर, दादासाहेब दिसगद, किशोर भवार, भाऊ वाघ, नारायण देशमुख, सतीश भोसले, मच्छिंद्र गुंजाळ, बाबुराव आल्हाट, भारत राऊत, गणेश थोरात, सुनील डोंगरे, गणेश जाधव, जनार्दन जाधव, किरण बाचकर, अशोक आढाव, भाऊसाहेब जाधव, रंजना शिंदे, दशरथ खामकर, लालू तुपे, अंकुश जाधव आदी ग्रामस्थांनी केली आहे.

मानोरी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने यातील सर्व बिर्‍हाड सध्या रेणुका माता भगवती देवस्थान ट्रस्टच्या खोलीत स्थलांतरित करण्यात आले आहे. या इमारतीची पंचायत समितीच्या अधिकार्‍यांनी दोन वेळेस पहाणी केली आहे. परंतु अद्याप या इमारतीचा प्रश्न मार्गी का लागत नाही? असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे. या इमारतीच्या न होण्यामागे राजकीय श्रेयवाद असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची पडझड पाहून आरोग्य विभागाकडून चार वर्षांपासून कुठल्याही वीजबिल अथवा भाडे न घेता श्री रेणुकामाता भगवती देवस्थान ट्रस्ट येथे जागा उपलब्ध करून दिली आहे. तरीही अद्याप या इमारतीचे काम सुरू होईना या इमारतीचे कामलवकरात लवकर पुर्णत्वाकडे जावे.

- नानासाहेब आढाव अध्यक्ष, श्री रेणुका माता भगवती देवस्थान ट्रस्ट मानोरी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com