मानोरी ग्रामसभेत वाळू लिलावाला ग्रामस्थांचा विरोध

मानोरी ग्रामसभेत वाळू लिलावाला ग्रामस्थांचा विरोध

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यातील मानोरी येथील मुळा नदीपात्रातील वाळू लिलावाला ग्रामसभेत ग्रामस्थांकडून विरोध करण्यात आला.

वेळ प्रसंगी रक्त सांडू पण वाळुचा खडा देखील उचलू देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने अखेर वाळू लिलाव रद्द करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी राहुरी तालुक्यातील पूर्वभागात मुळा नदीपात्रातील वाळुचा लिलाव करण्याचा निर्णय घेत राहुरीचे तहसीलदार फसिउद्दीन शेख यांना आदेश काढले. त्यानुसार राहुरी तहसीलचे मंडलाधिकारी मेहेत्रे, कामगार तलाठी राहुल कर्‍हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मानोरी येथे विशेष ग्रामसभा घेत वाळू लिलावातून विकासासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले.

मात्र, ग्रामस्थांनी विरोध दर्शविला. डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक उत्तमराव आढाव म्हणाले, वाळुचा लिलाव झाला तर हजारो वर्षापासून नदीकाठावरील पिकणारी शेती उध्वस्त होऊन जनावरांसह लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल. पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र आढाव म्हणाले, आमच्या अनेक पिढ्यांनी या वाळुचे संरक्षण केल्यामुळे आज मानोरी गाव शेतीसाठी सुजलाम सुफलाम आहे. त्या वाळुला आम्ही कदापी हात लावू देणार नाही.

डॉ. बाबासाहेब आढाव म्हणाले, आमच्या ठरावाला डावलून शासनाने वाळुचा लिलाव करण्याचा प्रयत्न केला तर वेळप्रसंगी रक्त सांडू पण वाळुच्या खड्याला हात लावू देणार नाही. मुळा नदीच्या पाण्यावर आमच्या अनेक पिढ्यांनी आपली उपजीविका करुन आपले प्रपंच स्थिरस्थावर केले.

आज वाळुचा लिलाव झाला तर या भागात शेतीच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. आमच्या आजच्या चुकीमुळे भविष्यात आमची मुले आम्हाला माफ करणार नाही. शासनाने आमची उपजीविका असणार्‍या शेतीचे पाणी हिरावून घेऊ नये, असे सांगितले.

यावेळी निवृत्ती आढाव, डॉ. राजेंद्र पोटे, शिवाजी थोरात, शामराव आढाव, अण्णासाहेब तोडमल, सुनील पोटे, बाबासाहेब आढाव, बाजीराव आढाव, संभुगीरी गोसावी, भाऊसाहेब आढाव, पाराजी ठुबे, वैभव पवार, गंगाधर खुळे, शहाराम आढाव, गोरक्षनाथ गुंड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com