मानोरीच्या ग्रामसभेत अभूतपूर्व गोंधळ

आजी माजी पदाधिकारी एकमेकांवर धावले
मानोरीच्या ग्रामसभेत अभूतपूर्व गोंधळ

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यातील मानोरीत आजी-माजी पदाधिकार्‍यांमध्ये अभूतपूर्व गोंधळ होऊन चांगलीच शाब्दिक चकमक झाली. तसेच एकमेकांच्या अंगावर धावून येण्याची घटना ग्रामसभेत घडली. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या प्रश्नावरून एका माजी ग्रामपंचायत सदस्याने आजी सदस्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप एका विद्यमान सदस्यांनी केल्यानंतर सभेत चांगलीच खडाजंगी उडाली. शिवीगाळ करणार्‍या माजी सदस्याला विद्यमान सदस्यांनी घेराव टाकत जाब विचारला. मात्र, शिवीगाळ झाल्याच्या घटनेचा माजी सदस्याने सपशेल इन्कार केला. काहींनी मध्यस्थी करत अखेर वादावर पडदा टाकला.

मानोरी येथील ग्रामसभा हनुमान मंदिराच्या सभागृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच आब्बास शेख, दयावान हे होते. तर सभेचे कामकाज ग्रामविकास अधिकारी मुरलीधर रगड यांनी पाहिले. ग्रामपंचायत 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत झालेल्या विकास कामासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच आगामी होणार्‍या विविध विकास कामांवर साधक-बाधक चर्चा करण्यात आली. जलजीवन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी तसेच पाईपलाईन साठी शासकीय स्तरावर निधी उपलब्ध झाला आहे सदर कामाच्या नियोजनासाठी साधक-बाधक चर्चा करण्यात आली असून लवकरच हे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती सरपंच अब्बास शेख यांनी सभेत दिली.

चर्चा सुरू असताना रस्त्याच्या प्रश्नावरून एका नागरिकाने खाजगी रस्त्यावर शासकीय निधीतून रस्ता खडीकरण करावा, अशी मागणी केल्यानंतर सदर रस्ता मालकीच्या असलेल्या व्यक्तीने त्यावर आक्षेप घेत त्या दोघांमध्येही चांगलीच खडाजंगी झाली. एकमेकांवर धावून येण्याचा प्रकार देखील घडला. एकंदरीतच ही ग्रामसभा चांगलीच वादळी ठरली.

धुमाळ यांची जमीन बक्षीसपत्र

मानोरी येथे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याच्या टाकीसाठी एक कोटी 28 लाख रुपयांचा निधी शासन स्तरावर मंजूर झाला आहे. ही पाण्याची टाकी बांधण्यासाठी डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन रामदास विश्वनाथ धुमाळ पाटील यांच्या स्नुषा सौ.वनिता सुधीर धुमाळ यांनी आपल्या मालकीची एक गुंठा जमीन बक्षीसपत्र करून दिल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com