मानोरीच्या शेतकर्‍याची बियाण्यात फसवणूक

मानोरीच्या शेतकर्‍याची बियाण्यात फसवणूक

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अण्णासाहेब तोडमल या शेतकर्‍याची एका नामांकित कंपनीकडून कांदा बियाणात फसवणूक झाली.

एका नामांकित कृषीसेवा केंद्रातून बियाणे खरेदी केल्यानंतर लालकांदा निघण्याऐवजी तो पांढरा कांदा निघाल्याने शेतकर्‍याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या शेतकर्‍याने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीतील कृषीसेवा केंद्रातून नामांकित कंपनीचे गावरान लालकांदा बियाणे खरेदी करून शेतात उत्तमप्रकारे मशागत करून कांदा बियाण्याची लागवड केली. मात्र, कांदा जसजसा मोठा होऊ लागला, तसतसा तो पांढरा आढळून येऊ लागला.

हे बियाणे गावरान लालकांदा नसून ते पांढरा कांद्याचे असून यात आपली घोर फसवणूक झाल्याचे तोडमल यांच्या लक्षात आले. त्यांनी राहुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला, त्यानुसार तक्रार दिली आहे.

देवळाली प्रवरा येथील नितीन बबन खांदे व रोहित विठ्ठल शेटे या शेतकर्‍यांनी देखील राहुरीत कृषीसेवा केंद्रातून नामांकित कंपनीचे गावरान बियाणे खरेदी केले होते. त्यांचीसुध्दा फसवणूक झाली आहे. तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

आमची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही राहुरी येथील कृषीसेवा केंद्र चालकांशी संपर्क साधला होता. त्यावेळी त्यांनी कंपनीशी बोलून घेतले.तुम्हाला पांढर्‍या कांद्याच्या बदल्यात लालकांदा देऊ, असे सांगितले होते. पण नंतर कंपनीने फोन उचलले नाही. म्हणून त्या कंपनीवर कारवाई करून नुकसान भरपाई मिळावी.

- अण्णासाहेब तोडमल, शेतकरी, मानोरी

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com