मनमाड-दौंड रेल्वेचा कोपरगाव हद्दीतील भुयारी मार्ग ठरला डोकेदुखी

मनमाड-दौंड रेल्वेचा कोपरगाव हद्दीतील भुयारी मार्ग ठरला डोकेदुखी

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

मनमाड-दौड रेल्वेमार्गावर ज्या ज्या ठिकाणी चौक्या आहेत, त्या रेल्वे वाहतूक वाढल्याने बंद असतात. परिणामी क्रॉसिंग रस्त्यावरील वाहतूक खोळंबते. ही वाहतूक सुरळीत व्हावी, या उद्देशाने रेल्वे विभागाने भुयारी मार्ग तयार केले. पण कोपरगाव हद्दीतील या मार्गात पावसाचे प्रचंड पाणी साठले असून त्याचा मनःस्ताप पादचारी, दुचाकी, चारचाकी वाहनधारकांसह शाळा महाविद्यालयीन शिक्षण घेणारे, शेतकरी आदींना होत आहे. हे भूयारी मार्ग म्हणजे डोकेदुखीचे मार्ग बनले आहेत.

या मार्गावर एकूण 180 रेल्वेचौक्या आहेत. त्यावर एका भुयारी बोगद्यासाठी रेल्वे प्रशासनाने 2 कोटी रुपये खर्च केला आहे. भुयारी मार्ग हा बंद रेल्वेचौक्यांना पर्याय होता. पण तेही सपशेल चुकलेले आहेत. ज्या ब्रिटिशांनी बांधकाम तंत्रज्ञ प्रगत नसतानाही मनमाड दौंड रेल्वेमार्ग तयार केला, तो स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळातही बंद पडला नाही. पण आता संगणक क्षेत्राचा प्रभावी वापर होत आहे, बांधकाम तंत्र प्रगत झाले आहे. तेव्हा हे भुयारी बोगदे ज्या अभियंत्यांनी तयार केले त्यांना पावसाच्या पाण्याचा जराही अंदाज येऊ नये, म्हणजे रेल्वेचा कारभार रामभरोसे म्हणण्याची वेळ आली आहे.

भुयारी बोगदे केल्याने रेल्वे चौक्या प्रवासासाठी बंद केल्या आहेत. पण यात पावसाचे पाणी प्रचंड साठल्याने भुयारी मार्गही बंद आहेत. अशा दुहेरी अडचणीत हे प्रवाशी सापडले आहेत. रेल्वे प्रशासनाकडे याचे गार्‍हाणे मांडले तर त्याची सोडवणूक होत नाही. भुयारी मार्गात साठलेले पाणी इंजिनच्या सहाय्याने काढायचे कुणी? पाणी काढले तर ते सोडायचे कुठे? कारण सध्या पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतातही पाणी साठलेले आहे. या भागातील प्रवासी शेतकरी आणि दैनंदिन कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करणार्‍यांना या भुयारी मार्गाचा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. काहींना आठ ते पंधरा किलोमिटरचा दुरवरचा कोलदांडा पडत आहे. तर आजारी रूग्ण वाचण्याऐवजी यमसदनी जाण्याची चिन्हे यातून मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

कोपरगांव चौकी गेट नंबर 69 चांदर वस्ती जवळील खिर्डी गणेश शिवार गेले 15 पंधरा दिवसा पासून पावसाचे पाणी भरले. पाणी उपसा होत नाही. 500 लोकांचे रोजचे येणे-जाणे अवलंबून आहे. शेतीमाल वाहतूक बंद आहे. मोटार सायकल रुळावरुन काढावी लागते, दूध उत्पादक शेतकरी वर्गाचे हाल होत आहेत, जीवघेणी वाहतूक यमसदनी पाठवेल, अशी आवस्था आहे.

वेळोवेळी रेल्वेचे स्थानिक प्रशासन दखल घेऊन उपाययोजना करत नाहीत. तेव्हा बाबासाहेब चांदर, संजय चांदर, बाळासाहेब चिंचपुरे, ढगे, अरुण लबडे, रवी आढाव, साईनाथ रोहम, आशिष महानूर, गंगाराम नेटके, ज्ञानेश्वर चांदर, सार्थक आढाव, योगेश चांदर, संजय मोडके यांनी जोपर्यंत पाणी उपसा होत नाही, तोपर्यंत रेल्वेगेट उघडून द्यावे, अशी मागणी केली आहे.

Related Stories

No stories found.