मांजरीत माती वाहतूक करताना वाहने पकडली

राहुरी पोलिसांची धाडसी कारवाई; 45 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; आरोपी पसार
मांजरीत माती वाहतूक करताना वाहने पकडली

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यात महसूल प्रशासनाच्या छुप्या आशिर्वादाने वाळूसह गौणखनिजाची सर्रास तस्करी होत आहे.

दरम्यान, राहुरी तालुक्यातील मांजरी येथे शेतातील माती विनापरवाना, बेकायदेशीर उत्खनन करताना पोलिसांनी धाडसी छापा टाकला. एक जेसीबी, चार ट्रॅक्टर दोन ब्रास मातीसह 45 लाख 18 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल रेडहॅण्ड पकडून ताब्यात घेण्यात आला.

याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध पर्यावरण संरक्षण व शेतातील माती काढून टाकण्याच्या कायद्यान्वये राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून सर्व आरोपी पसार झाले आहेत.

संदीप एकनाथ विटनोर (रा.मांजरी), आशीर लालाभाई शेख (रा. पिंप्री वळण), सुनील दादा जंगले, ज्ञानेश्वर रखमाजी कंक, नवनाथ ज्ञानेश्वर जंगले, जिजाबाई वसंत जंगले (चौघेही रा.पानेगाव, ता. नेवासा) मोहम्मद शेख (रा.खेडले परमानंद, ता.नेवासा), जनार्दन गागरे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही), न्यू हॉलंड कंपनीच्या निळ्या रंगाचा ट्रॅक्टरवरील चालक अशी आरोपींची नावे आहेत.

मांजरी येथे गट नंबर 618 मधील शेतजमिनीतील शासनाच्या मालकीची माती विनापरवाना, बेकायदेशीर उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलीस खात्याला मिळाली.

बुधवारी दुपारी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, परीविक्षाधीन उपनिरीक्षक नीरज बोकील यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी छापा टाकला. पोलीस पथक पाहताच आरोपी पसार झाले. पोलीस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण केकाण यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com