दक्षिण पठारावरील मांडवी-कच नदीजोड प्रकल्पाची 23 गावांची मागणी

दक्षिण पठारावरील मांडवी-कच नदीजोड प्रकल्पाची 23 गावांची मागणी

ब्राम्हणवाडा |वार्ताहर| Bramhanwada

अकोले-संगमनेर पठार भागावरील तेवीस गावांचा पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा

यासाठी या गावांच्या नजीक असलेल्या चिलवाडी धरणाचे पाणी केंद्र शासनाच्या नदीजोड प्रकल्पातून किंवा राज्य व केंद्र शासनाने राबविलेल्या उपसा सिंचन योजनेतून मिळावे,अशी मागणी अकोले - संगमनेर दक्षिण पठार भाग पाणी वंचित कृती समिती अध्यक्ष बबनराव शेळके व कार्याध्यक्ष संभाजी जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे.

कृती समितीचे सर्व पदाधिकारी व तेवीस गावच्या अनेक सदस्यांनी मंत्रालयात लेखी निवेदन देऊन कृष्णा खोरे व गोदावरी खोरे तथा मांडवी - कच नदीजोड प्रकल्पाची मागणी करून प्रकल्पाला सर्व शासकीय मदत मिळावी अशी मागणी केली आहे.

मांडवी व कच नदी एकमेकांना जोडली गेल्यास हा दुष्काळी पठार भाग कायमस्वरूपी सुजलाम सुफलाम होऊ शकतो. पठार भागाच्या या ड्रीम प्रोजेक्टसाठी अध्यक्ष बबनराव शेळके व कार्याध्यक्ष संभाजी जाधव, भानुदास शिंगोटे, किरण शिंगोटे, संतोष शिंगोटे, संपत शिंगोटे, चंद्रकांत संताजी, मारुती मातेले, नवनाथ सरोदे तसेच

तेवीस गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व इतर कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत असून ते वर्षभरात तत्कालीन मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, जलसंधारण मंत्री अकोले, संगमनेर, जुन्नर या तिन्ही तालुक्यांचे आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, पाटबंधारे विभाग यांना भेटून त्यांनी या प्रकल्पाचे प्रस्ताव दाखल केले आहेत. जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडून सदर मागणी प्रस्ताव पुढील कार्यवाहीकरिता पाटबंधारे विभाग अहमदनगर यांचेकडे पाठवून आम्हाला पत्राद्वारे कळविले असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.

23 गावे दक्षिण पठारावर उंचीवर वसलेली आहेत व कायम पिण्याच्या पाण्यासाठी वंचित आहेत. म्हणून काळू, मांडवी, पुष्पावती-कच नदीजोड प्रकल्पाची मागणी अशी आहे, अकोले तालुक्यातील फोपसंडी दर्याबाई मंदिर येथे उगम पावणार्‍या मांडवी नदीचे, येसरठाव व पळसुंदे तलावाचे पाणी उपसा सिंचनाने चिल्हेवाडी धरण ते कच नदी उगम करंडी (ब्राह्मणवाडा) येथील आनंददरा तलावात पाईपलाईनने सोडणे व तेथून पाणी वंचित अकोले व संगमनेर तालुक्यातील कळंब, मन्याळे, पिसेवाडी, खुंटेवाडी, ब्राम्हणवाडा, वनकुटे, जांभळे, काळेवाडी, बदगी, चैतन्यपूर, बेलापूर, म्हसवंडी, जाचकवाडी, भोजदरी या गावांना पाईपलाईनने पुरविणे किंवा कच नदीत सोडून कच नदी बारमाही करणे त्यामुळे पाणी वंचित गावांना याचा फायदा होईल.

सध्याची चिल्हेवाडी धरणातून रोहोकडी, फापाळेशिवार, डोमेवाडी, डुंबरवाडी, खामुंडी, पिंपरीपेंढार, आळेफाटामार्गे बोरीला जाणार्‍या अकोले-संगमनेर तालुक्यातील गावांना वळसा मारून जाणार्‍या पाईपलाईनमधून शक्य असेल तेथे अकोले व संगमनेर तालुक्यातील जांभळे, काळेवाडी, बदगी, म्हसवंडी, माळवाडी येथे पाईपलाईनमधून पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणीपुरवठा करणे.

या प्रमुख तीन मागण्या काळू, मांडवी, पुष्पावती-कच नदीजोड प्रकल्पाच्या आहेत. जेणेकरून कच नदी बारमाही होईल व अकोले -संगमनेर पाणी वंचित दक्षिण पठार भागातील 23 गावांचा पिण्याचा व सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल व या भागामध्ये हरित क्रांती होईल. त्यासाठी अकोले व संगमनेर या दोन्ही तालुक्यांतील लोकप्रतिनिधींनी या महत्त्वाच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.

कच नदी बारमाही झाल्यास आनंददरा साठवण तलाव व बेलापूर धरण तसेच कोटमारा धरण सतत पूर्ण क्षमतेने भरून राहिल व सतत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊन ही सर्व गावे टँकरमुक्त होतील व परिसरात पाणी झिरपल्याने काहीअंशी हंगामी बागायती शेती क्षेत्रात निश्चितच वाढ होईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com