ममदापूरमध्ये पोलिसांचा छापा

6 गायी, 6 वासरे, 200 किलो गोमांससह 5 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त
ममदापूरमध्ये पोलिसांचा छापा

लोणी |वार्ताहर| Loni

नव्या पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सक्त आदेशामुळे जिल्ह्यात गोवंश हत्या आणि मांस विक्री करणारांच्या मुसक्या आवळण्यात येत आहे. शनिवारी लोणी पोलिसांनी ममदापूर येथील कुरेशी मोहल्ल्यात छापा टाकून 6 गायी, 6 वासरे, 200 किलो मांस आणि इतर साहित्यासह सुमारे 5 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त केला तर चार आरोपींना अटक केली.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लोणीचे सपोनि समाधान पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक सुदाम फटांगरे, पोलीस नाईक असिर सय्यद, दीपक रोकडे, कैलास भिंगारदिवे यांच्या पथकाने राहाता तालुक्यातील ममदापूर येथील कुरेशी मोहल्ल्यात सकाळी 8 वा. छापा टाकला.

त्यात कत्तलीसाठी आणलेल्या गोवंश जातीच्या प्रत्येकी 6 गायी व वासरे यांची सुटका करण्यात आली. 200 किलो गोवंश मांस, महिंद्रा पीकअप गाडी असा 5 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जब्बार हसन शेख, कैफ रउफ कुरेशी, जाविद नाजूक खाटीक, कृष्णा एकनाथ गोरे, सर्व रा. ममदापूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सुधारित कलमानुसार गुरनं 558/2022 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com