माळवाडगावच्या ग्रामसभेला शासकीय अधिकार्‍यांची अनुपस्थिती

ग्रामस्थांमधून संताप, ग्रामसभा स्थगित || पुन्हा 6 सप्टेंबर रोजी ग्रामसभा
Gramsabha
Gramsabha

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील माळवाडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात दि.31 रोजी सकाळी 9 वाजता प्रशासक नारायण गोराडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, शासकीय अधिकार्‍यांची अनुपस्थिती असल्याने ग्रामस्थांनी ग्रामसभा घेण्यास विरोध केला असता सदर ग्रामसभा रद्द करण्याची नामुष्की प्रशासक नारायण गोराडे व ग्रामसेवक रावसाहेब डौले यांच्यावर ओढावली.

माळवाडगाव येथील ग्रामपंचायतची 15 ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा दि. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता माळवाडगाव ग्रामपंचायतच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. सदर ग्रामसभा सुरू होण्यापूर्वी ग्रामस्थांनी सदर ग्रामसभेस ग्रामस्तरावरील कर्मचारी व अधिकारी तलाठी, कृषी सहाय्यक, वनपाल, शिक्षक, वायरमन, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक ग्रामसभेस उपस्थित का नाहीत? असा सवाल करत सदर ग्रामसभा शासकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीशिवाय घेण्यास विरोध केला. अखेर प्रशासक नारायण गोराडे व ग्रामसेवक रावसाहेब डौले यांनी सदर ग्रामसभा शासकीय अधिकार्‍यांच्या अनुपस्थिती व कोरम अभावी रद्द करून पुढील ग्रामसभा दि.6 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. मात्र, गावात कर्तव्यावर असणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी हे ग्रामसभेला अनुपस्थित असल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत ग्रामसभेला अनुपस्थित असणार्‍या अधिकारी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली.

सध्या श्रीरामपूर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने पाण्याअभावी पिके जळून चालले आहे.काही शेतकर्‍यांना थोडेफार पाणी आहे. मात्र, शेतीचा वीजपुरवठा अनियमित व कमी दाबाने होत असल्याने पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे डोळ्यासमोर उभी पिके पाण्याअभावी जळून चालले आहेत. त्यामुळे शेतकरी पुरते हतबल झाले आहेत.अशा परिस्थितीत कृषी सहाय्यक, तलाठी, वीज वितरणचे अधिकारी, पाट बंधारे विभागाचे अधिकारी, यांनी ग्रामसभेमध्ये उपस्थित राहून ग्रामस्थांच्या शकांचे निराकरण करणे आवश्यक होते. तसेच साथीच्या रोगाचा प्रादूर्भाव असल्याने वैद्यकीय अधिकारी - कर्मचारी यांनीही ग्रामसभेत जनजागृती करणे गरजेचे होते. मात्र, कोणतेही अधिकारी उपस्थित नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

यावेळी रावसाहेब आसने, नानासाहेब आसने, बाबासाहेब आसने, प्रमोद आसने, ,बबन आसने, रावसाहेब काळे, विठ्ठल आसने, आशिष आसने, योगेश आसने, प्रदिप आसने आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यासंबंधी कामगार तलाठी कचेश्वर भडकवाल, कृषी सहाय्यक रूपाली काळे यांच्याशी संपर्क साधला असता आम्हाला माळवाडगाव ग्रामपंचायतीकडून ग्रामसभेसंदर्भात कोणतीही पूर्व सूचना नसल्याची माहिती त्यांनी दिली.

ग्रामपंचायत प्रशासनाचा हलगर्जीपणा

ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामसभा आयोजित करत असताना सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांना याबाबत सूचना देणे बंधनकारक असताना देखील माळवाडगाव ग्रामपंचायत प्रशासनाने गावाशी संबंधित असलेल्या कोणत्याही अधिकारी कर्मचार्‍यांना याबाबत सूचना केली नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणाबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

माळवाडगाव ग्रामपंचायतीची स्थगित करण्यात आलेली ग्रामसभा 6 सप्टेंबर रोजी होणार असून त्या ग्रामसभेसंदर्भात सर्व शासकीय अधिकार्‍यांना उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात येईल, अशी माहिती ग्रामसेवक रावसाहेब डौले यांनी दिली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com