माळवाडगाव येथे बंदिस्त शेडमधून 25 सोयाबीन कट्ट्याची चोरी

माळवाडगाव येथे बंदिस्त शेडमधून 25 सोयाबीन कट्ट्याची चोरी

माळवाडगाव |वार्ताहर| Malvadgav

शेतकर्‍यांनी खरीप हंगामात नव्याने काढणी केलेल्या सोयाबीन कट्टे चोरीचे सत्र सुरू असतानाच आज श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथे शेतकर्‍याच्या बंदिस्त शेडमधून लोखंडी जाळी तोडून 25 सोयाबीन कट्ट्याची चोरी झाल्याने श्रीरामपूरच्या पूर्व गोदाकाठ परिसरात शेतकर्‍यांत खळबळ उडाली आहे.

खरिपातील सोयाबीन काढणी काळात मागील वर्षी खोकर, भोकर, वडाळा महादेव परिसरात सोयाबीन चोरीच्या जबरी घटना घडल्या होत्या. सालाबादप्रमाणे यावर्षीही चोरट्यांनी सोयाबीन कट्टे कुठं शेतातूनच तर कुठं घरातल्या ओसरीतून तर खंडाळ्यात गोडावूनमधून रात्री चोरी करण्याच्या घटनेत खंड पडू दिला नाही. चार दोन कट्टे चोरीच्या घटना घडलेले त्रस्त शेतकरी पोलिसांत खबर देण्याच्या प्रयत्नात पडलेले नाहीत. दिवाळीपूर्वी रात्री मशिनवर सोयाबीन काढून कट्टे बारदान्याखाली झाकून थकलेले गोकुळ मुठे कुटुंब घरी जाऊन झोपले. सकाळी उठल्यावर सोयाबीन कट्टे आणण्यासाठी शेतात गेले तर पाच कट्टे गायब?

या मुठेवाडगाव येथील घटनेने पंचक्रोशीतील शेतकर्‍यांनी तयार केलेल्या सोयाबीनचे कट्टे बर्‍यापैकी भाव येईपर्यंत तरी सुरक्षित ठेवण्याची काळजी घेतलेली असतानाच माळवाडगांव शिवारात गट नं.59 मध्ये हरिगाव रस्ता वस्तीवर बाळासाहेब मारूती आसने यांच्या शेतासह राहत्या वस्तीलाही तार कंपाऊंड. त्यात बंदीस्त शेडलाही दणकट जाळी त्यात सोयाबीनचे कट्टे सुरक्षित होते. मालकाच्या मनात यत्किंचितही चोरीची कल्पना नसताना. आज बुधवार दि.9 नोव्हेंबर मध्यरात्रीच्या सुमारास शेडच्या मागील बाजुची जाळी तोडून 25 कट्टे अंदाजीत 13 क्विंटंल (रक्कम 62500) चोरट्यांनी लंपास केले.

बाळासाहेब मारूती आसने यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नवनाथ बर्डे पुढील तपास करीत आहेत.

चोरट्यांनी वाहनात बसेल तेवढेच कट्टे उचलले...

बंगल्यासमोरील बंदीस्त शेडमध्ये 100 कट्टे होते. कदाचीत मोठे वाहनं असते तर चोरीची व्याप्ती वाढली असती. सध्या खेड्यात जिकडे तिकडे लेबर व माल वाहतुकीसाठी सुळसुळाट झालेल्या छोट्या वाहनापैकी वाहन असल्याचा अंदाज प़ पोलिसांनी बांधला असून या चोरीच्या मुळापर्यंत जाणे अवघड जाणार नसल्याचे सुत्रांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com