माळवाडगाव येथे पूर्वीच्या वादातून राडा

एक दुचाकी पेटविली, तिघांविरुद्ध गुन्हा, गावात दहशत
माळवाडगाव येथे पूर्वीच्या वादातून राडा

माळवाडगाव |वार्ताहर| Malvadgav

दोन तरुणांचा पुर्वीचा वाद पुन्हा उफाळून आल्याने परस्परांच्या मोटारसायकलच्या तोडफोडी नंतर एकाची मोटारसायकल पेटवून दिल्याची घटना माळवाडगाव जिल्हा परिषद शाळेच्या गेटसमोर सायंकाळच्या सुमारास घडली.

काही महिन्यांपूर्वी आज घटना घडलेल्या ठिकाणीच प्राथमिक शाळेसमोर एका तरुणाने दुसर्‍या तरुणावर चाकू हल्ला केला होता. पोलिसांत गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी जखमी तरुणाला रुग्णालयात तर आरोपीला ताब्यात घेतले होते. चाकूचे वार करणार्‍या आरोपीस जामीन झाल्यानंतर गावात एकमेकांत संघर्ष वाढतच होता. पूर्वीच्या वादामुळे अधूनमधून त्यांच्यात खटके उडत. आज मात्र भडका उडाला. पूर्वी ज्या तरुणाने वार केले होते. त्यास मारहाण करून त्याची मोटारसायकल फोडण्यात आली. त्यानंतर शहरी गुंडगिरी प्रमाणे गावात पळापळ व दहशतीचा राडा सुरू झाला.

याचवेळी गावात दत्तजयंती मिरवणूक सुरू असल्याने हा प्रकार लवकर लक्षात आला नाही. ज्या तरुणावर हल्ला झाला त्याने स्वत: 112 नंबरवर ही खबर पोलिसांना दिल्याने पोलीस तातडीने गावात दाखल झाले. त्यांनी खबर देणार्‍या जखमी तरुणास उचलून उपचारासाठी रुग्णालयात नेले.पोलीस निघून गेल्यानंतर दुसर्‍या तरुणाने दहशतीच्या वातावरणात आपल्या सहकार्‍यांसह येऊन मोटारसायकल पेटवून दिली. हा सर्व प्रकार गावकरी उघड्या डोळ्याने पहात होते. या राड्यामुळे गावात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी गणेश दत्तात्रय पठारे या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात आरोपी सुजीत आसने, सुशिल वाकेकर, तेजस मोरे या तरुणांविरूद्ध गुन्हा र. नं. 523/2022 भा.दं.वि. कलम 324, 323, 504, 506, 427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार असून दुसर्‍या दिवशी पोलिसांनी जळालेल्या मोटारसायकलचा पंचनामा करून घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक श्री. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल नवनाथ बर्डे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com