
माळवाडगांव |वार्ताहर| Malvadgav
माळवाडगावसह परिसरातील गावांच्या शेतकर्यांचे कोट्यवधी रुपयांचे देणे बुडवून कुटुंबियासह पसार झालेल्या
मुथ्था प्रकरणातील सर्व आरोपींना जेरबंद करण्यात श्रीरामपूर तालुका पोलिसांना यश आले असून आरोपींची प्रॉपर्टी पतसंस्था, बँकांकडे तारण असली तरी आम्ही केआरपीसी अधिकार वापरून 160 ची नोटीस पाठवून शेतकर्यांना अगोदर प्राधान्याने पैसे कसे मिळतील यासाठी कोर्टापुढे शेतकर्यांचे बाजूने भरभक्कम पुरावे सादर करणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत सांगितले.
शेतकरी फसवणूक मुथ्था प्रकरणातील सर्व आरोपी जेरबंद केल्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गुन्ह्यांची माहिती देताना संदीप मिटले म्हणाले की 9 फेब्रुवारी 2021 रोजी विजय सिताराम आसने यांनी फिर्याद दाखल केली असता पोलिसांनी गु.र.नं.21/2021 भा.द.वि.क.420,406 464,471,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
गावात गेल्या 20 वर्षांपासून राहत असलेल्या व्यापारी रमेश रामलाल मुथ्था, चंदन रमेश मुथ्था, गणेश रामलाल मुथ्था, आशा गणेश मुथ्था, चांदनी चंदन मुथ्था या सर्वांनी भुसार माल सोयाबीन हरभरा,मका खरेदी करताना बाजार भावापेक्षा जादा भाव देण्याचे आमिष दाखवून 100 ते 200 शेतकर्यांना वायदा करून माल विक्रिच्या वहीत नोंद करत चिठ्ठ्या दिल्या काहींना एचडीएफसी, बँक ऑफ महाराष्ट्रचे रक्कम शिल्लक खोटे चेक दिले, दोन कोटी रुपयांची फसवणूक करून 6 फेब्रुवारी 2021 रोजी कुटुंबियांसह पसार झाले होते.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस पथके तयार करण्याच्या सूचना दिल्या.त्यानुसार नव्याने पदभार स्विकारलेल्या पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, हे.का.नवनाथ बर्डे,हे.का राजेंद्र लवांडे,पो.का अशोक पवार, पो.का.प्रशांत रणवरे,पो.का.दादासाहेब लोंढे,हे.का सतीश गोरे, श्रीकांत वाबळे, काकासाहेब मोरे, अनिल शेंगाळे, महिला पोलीस बबिता खडसे,वंदना पवार, प्रियंका शिरसाठ ,असे पथके तयार करण्यात येऊन आरोपींचा गुजरात सह ठाणे,जळगाव, धुळे, आदी ठिकाणी शोध घेत अखेरचे आरोपी जालन्यात जेरबंद करून काम फत्ते केले.
यातील रमेश मुथ्था, चंदन मुथ्था व गणेश मुथ्था यांना 15 एप्रिल प्रथमतः पोलीस कोठडी तर आशा मुथ्था व चांदनी मुथ्था यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या शोधमोहिमेत टेक्निकल एक्स्पर्ट, सायबर एक्सपर्टची मोलाची मदत मिळाली.गुन्ह्यातील रकमेची व्याप्ती वाढणार असून आरोपीकडून मालमत्तेची जास्तीत जास्त रिकव्हरी करण्यात येणार आहे.