माळवाडगाव भवानी देवी मंदिराची दानपेटी फोडली
सार्वमत

माळवाडगाव भवानी देवी मंदिराची दानपेटी फोडली

सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकडची चोरी

Arvind Arkhade

माळवाडगाव |वार्ताहर| Malvadgav

श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील गावांसह पंचक्रोशीतील भाविकांचे जागृत कुलदैवत असलेल्या भवानी देवी मंदिराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून दानपेटी फोडून अंदाजे रोख रक्कमेसह व देवीच्या नाकातील सोन्याची नथ व चांदीचा एक अलंकार चोरट्याने मध्यरात्री चोरून नेल्याची घटना काल पहाटे उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

करोना पार्श्वभूमीवर मंदीर चार महिने भाविकांना दर्शनासाठी बंद होते.दररोज पुजारी पहाटे दैनंदिन महापूजा आरती, सायंकाळच्या आरतीसाठी मंदीर उघडत असे. फक्त पोळा सणाचे दिवशी मंदीर भाविकांना दर्शनासाठी उघडण्यात आले होते. दुसर्‍या दिवशी बुधवारी सायंकाळी दिवाबत्ती आरती झाल्यानंतर आज गुरुवारी पहाटे 5.30 च्या सुमारास पुजारी महेश रत्नपारखी मंदिरात आल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला.

भवानी देवी ट्रस्ट अध्यक्षा डॉ.सुनीताताई आसने , सरपंच बाबासाहेब चिडे, माजी सरपंच डॉ.नितीन आसने , प्रभारी पोलीसपाटील संजय आदिक, गावातील प्रमुख कार्यकर्ते, पत्रकार तातडीने घटनास्थळी हजर झाल्यानंतर पोलिसांना खबर देण्यात आली.

यासंदर्भात विश्वस्त बाळासाहेब हुरूळे यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडल्या नंतर दानपेटीचेही कुलूप तोडून अंदाजे रोख रक्कमेसह देवीच्या नाकातील सोन्याची नथ, अंदाजे 3500 रुपये किमतीची चांदीची एक वस्तू अंदाजे किंमत 1 हजार रुपये असा एकूण 4500 रुपयांचा ऐवज चोरिस गेलेला आहे.

पोलीस निरीक्षक मसुद खान यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.ग्रामपंचायत सीसीटीव्ही कॅमेर्‍याची पडताळणी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल काकासाहेब मोरे, अशोक पवार, संदीप पवार, पठाण हे पुढील तपास करीत आहेत.

दान पेटीतून फक्त नोटाच उचलल्या दहा, पाच, नाण्यांसह चिल्लर जागेवर

देवी मूर्तीस गळ्यात बेंटेक्स दागिन्यांचा साज असल्याने ते सोडून खरी सोन्याची नथ व एक चांदीची वस्तू उचलली. शेजारी आरतीची मोठी पितळी घंटा , दानपेटीतील हजार पाचशेची चिल्लर जागेवरच ठेवून नोटा मात्र नेल्या. चिल्लर मागे सोडण्यामागे एकतर तिजोरीत भरपूर नोटा मिळाल्या असतील. नाहीतर आपण भुरटे नाही आहोत हे दाखवण्याचा हेतू असावा? अशीही शंका येते. भवानी देवी हे पुरातन अन् एक जागृत असे भाविकांची श्रध्दा असलेले स्थान आहे. गावातील, पंचक्रोशीतील गावोगावचे भाविक शुभकार्य प्रारंभ करण्याअगोदर कुलदैवत भवानी देवी दर्शन घेतल्या शिवाय कार्यारंभ करत नाहीत. पुर्वीचे दरोडेखोर मध्यरात्री गुपचुप देवीचे दर्शन घेतल्याशिवाय दरोडा टाकत नसे, अशी आख्यायिका आहे. अलीकडच्या भुरट्या चोरट्यांनी तर देवीच्या मंदिरावरच दरोडा टाकल्याने ते पोलिसांच्या जाळयात निश्चित अडकतील, असा आत्मविश्वास गावातील भाविकांना आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com