पाथर्डी नगरपालिकेतील गैरप्रकाराच्या चौकशीचे आदेश

अ‍ॅड. ढाकणे यांची माहिती: आ. राजळे यांच्यावरही आरोप
पाथर्डी नगरपालिकेतील गैरप्रकाराच्या चौकशीचे आदेश

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

गेली पाच वर्ष आ. मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या ताब्यात असलेल्या पाथर्डी नगरपालिकेमध्ये 120 कोटी रुपयांचे विकास कामे झालेली आहेत. यातील अनेक कामात गैरप्रकार झाला असून आ. मोनिका राजळे गैरप्रकाराच्या टक्केवारीत स्वतः सहभागी असल्याने त्याही संबंधीत गैप्रकाराला जबाबदार आहेत, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे नेते अ‍ॅड.प्रताप ढाकणे यांनी केला. तसेच पाच वर्षात नगरपालिकेत झालेल्या सर्व विकास कामाचे नगरविकास खात्याने चौकशीचे आदेश दिले असून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत याची संपूर्ण चौकशी केली जाणार असल्याचे अ‍ॅड. ढाकणे यांनी सांगितले.

शहरातील राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अ‍ॅड. ढाकणे यांनी आ. राजळे यांच्यावर गैरप्रकाराचे गंभीर आरोप करत पालिकेच्या कारभाराविषयी माहिती दिली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख, शिवसेनेचे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघाचे संघटक भगवान दराडे, माजी नगरसेवक बंडु बोरुडे, सिताराम बोरुडे, देवा पवार,योगेश रासने, बबलु शिरसाठ, भाऊसाहेब धस, चंद्रकांत भापकर आदी उपस्थित होते. अ‍ॅड. ढाकणे म्हणाले, नगरपालिकेच्या कारभाराबाबत 15 मुद्द्यांवर अ‍ॅड.हरिहर गर्जे यांनी राज्याच्या नगर विकास खात्याकडे तक्रार केली होती.

त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांना नगरपालिकेतील कोट्यावधी रुपयांच्या गैरकारभाराच्या चौकशीबाबत लेखी आदेश दिले आहेत. आ. राजळेंच्या नेतृत्वात नगरपालिकेत सत्ता आली होती. येथील भ्रष्ट कारभार रोखण्यासाठी आमदारांनी जबादारी घेतली नाही. विकास कामाच्या निधीत मोठी अफरातफर झाली आहे, म्हणून नगरविकास खात्याने पालिकेच्या कोठ्यावधीच्या विकास कामांची चौकशी लावली आहे. पालिकेची मुद्दत संपण्यासाठी काही दिवस शिल्लक असतांना शौचालयाच्या भुमीपूजन कामाचे नारळ फोडले जातात. मात्र त्या कामाचे टेंडर नाही. पालिकेच्या माध्यमातून शहरात झालेली सर्व कामे निकृष्ट आहे. या कारभाराला आ. राजळेच जबादार असल्याचा आरोप ढाकणे यांनी केला आहे.

खुलासा करण्याचे आवाहन

आ. राजळे यांनी पालिकेच्या गैरकारभाराची जबादारी स्वीकारून जाहीर खुलासा करावा, असे त्यांना आमचे आवाहन आहे. शहरात केलेल्या विकास कामांची सध्या काय परिस्थिती आहे. याची आपण शहरात फिरून माहिती घेतली का? शहरात काही कामानिमित्त फिरला आहेत ना, तुमच्या डोळ्याला भ्रष्टाचार का दिसला नाही, असे सवालही अ‍ॅड. ढाकणे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com