
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्हा परिषद महिला बालकल्याणच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत 15 ऑगस्ट ते 26 जानेवारीदरम्यान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त विशेष कुपोषण मुक्ती अभियान राबविण्यात आले. या अभियानाचे फलीत म्हणून जिल्ह्यातील तब्बल 41 हजार 236 विद्यार्थी हे कुपोषणातून बाहेर आलेले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी स्वत: या अभियानात लक्ष घातल्याने हे शक्य झाले असल्याचे महिला बालकल्याण विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात 14 तालुके असून त्या ठिकाणी 21 एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यरत आहेत. मार्च 2020 पासून कोविडमुळे अंगणवाड्या बंद असून बालकांना घरपोहच आहार देण्यात येत आहे. या आहारात धान्य, डाळी, तेल, मीठ आणि मिर्चीचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी धडक मोहिम राबविण्यात आली. यात कुपोषीत बालकांचा शोध घेणे, तसेच दुर्धर आजार व इतर आजार असणार्या बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.
जिल्ह्यात 3 लाख 37 हजार शुन्य ते सहा वर्षाची बालके असून यात 2 लाख 97 हजार 697 बालके ही सर्वसाधारण गटात आहेत. तपासणी केलेल्या बालकांपैकी 34 हजार 557 मध्यम वजनाची बालके असून 4 हजार 697 हे तिव्र वजनाची बालके आहेत. यासह 411 बालकांना वेगवेगळे दुर्धर आजार असल्याचे केलेल्या पाहणीत समोर आले होते. सर्व बालकांचे गावानिहाय व कुपाषित श्रेणीनिहाय यादी तयार करण्यात आली. यात बालकांचे नाव, पत्ता, अंगणवाडीचे नाव, जन्म तारिख, वय, वजन, उंची, आरोग्य समस्या, श्रेणी याच्या नोंदी घेण्यात आल्या.
नाव्हेंबर महिन्यांत मध्यम कमी वजनाच्या बालकांची संख्या 34 हजार 557 होती. तर श्रेणीत बदल झालेल्या बालकांची संख्या 14 हजार 216, वजनात वाढ झाली मात्र श्रेणी बदलेल्या बालकांची संख्या 17 हजार 267, तर तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या 4 हजार 697 होती. यात श्रेणीत बदल झालेल्या बालकांची संख्या 1 हजार 544 होती, तसेच वजन वाढले पण श्रेणी बदली नाही अशी 2 हजार 988 बालके होती. तर मॅम 4 हजार 834 बालके होती. यात श्रेणीत बदल झालेली 1 हजार 712, वजनात वाढ मात्र श्रेणी न बदललेली 2 हजार 992 आणि सॅममध्ये 871 बालके होती. यात श्रेणीत बदल झालेली 450, वजनात वाढ झालेली मात्र श्रेणी न बदलेली 367 बालके आहेत. अशा प्रकारे 41 हजार 236 बालकांचे कुपोषण कमी करण्यात झेडपीला यश आले आहे.
जिल्ह्यातील बालके कुपोषण मुक्त करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करण्यात आले. यासाठी धडक अभियान राबविण्यात आले. त्या अभियानाला यश मिळतांना दिसत आहे. जिल्ह्यातील जास्ती बालकांचे कुपोषण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
- मनोज ससे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बालकल्याण, जिल्हा परिषद
महिला बालकल्याण विभागाच्या तपासणीत जिल्ह्यात 411 बालके ही दुर्धर आजाराने पिडीत असल्याचे आढळून आले. यात 127 हृदय रोग पिडीत, 22 टाळूला छिद्र, 34 तिरळपणा, 24 कर्णबधीर, 90 मितीमंद, थॅलेसिमीया, 8 अस्तिव्यंग, 4 संडास छिद्र नसणारे आणि 24 इतर आजार असणारे होते. यातील 200 हून अधिक बालकांवर जिल्हा रुग्णालय, एसएनबीटी रुग्णालय इगतपुरी, कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.