
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मकर संक्रांतीमुळे माळीवाडा बस स्थानकावर फारशी गर्दी नव्हती. काही प्रवासी बसची वाट पाहत उभे होते. अशातच पोलिसांसह बंदूकधारी स्पेशल कमांडोंचा ताफा बस स्थानकात घुसला अन् सार्यांचीच तारांबळ उडाली. बस स्थानकात अतिरेकी घुसल्याची वार्ता सर्वत्र परसली. पोलिसांनी तब्बल दीड तास सर्च ऑपरेशन राबवत तीन अतिरेकी जेरबंद केले. प्रत्यक्षात पोलिसांचे हे प्रात्यक्षिक (मॉकड्रिल) असल्याचे समजल्यावर सार्यांनीच सुटकेचा श्वास सोडला.
रविवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास बस स्थानकात अतिरेकी घुसल्याच्या कॉल पोलिसांना आला अन् यंत्रणेची धावपळ उडाली. अवघ्या 15 मिनिटांत शिघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, कोतवाली, तोफखाना, एमआयडीसी, नगर तालुका, भिंगार पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली. महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक, रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचल्या.
अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक अजित पाटील यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, वरिष्ठ अधिकार्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांना घटनास्थळापासून सुरक्षित अंतरावर नेले. अतिरेक्यांनी काही प्रवाशांना ओलीस ठेवल्याचे समजताच पोलिसांनी अत्यंत नियोजनबध्दरित्या सर्च ऑपरेशन राबवत प्रवाशांची सुटका केली व अतिरेक्यांना जेरबंद केले.
तब्बल दीड तास सुरू असलेला हा थरार पाहून नागरिक व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, अखेर हे प्रात्यक्षिक असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. दहशतवादी आल्यासारखी एखादी घटना घडल्यास जिल्हा पोलीस यंत्रणा किती सतर्क आहे, याची तपासणी या प्रात्यक्षिकाव्दारे करण्यात आली. दरम्यान ऐन सणासुदीच्या दिवशी झालेल्या या मॉकड्रिलची दिवसभर चर्चा रंगली होती.