
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
तालुक्यातील माळीचिंचोरा फाटा येथे गुरुवारी नगर -औरंगाबाद महामार्गावर फॉर्च्युनर कारने दिलेल्या धडकेत संकेत लक्ष्मण पुंड (वय 19) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याने संतप्त झालेल्या माळीचिंचोरा ग्रामस्थांनी नगर-औरंगाबाद रस्त्यावर माळीचिंचोरा फाटा येथे अचानक रास्तारोको आंदोलन केले.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, मृत संदिप हा गुरुवारी दुपारी आपल्या आत्याला सोडविण्यासाठी माळीचिंचोरा फाटा येथे आलेला होता. आत्याला सोडवून जात असतांना औरंगाबादहून-नगरकडे जाणार्या भरधाव वेगातील फॉर्च्युनर कारने दुचाकीवर असलेल्या संकेत पुंड याला जोराची धडक दिल्याने संकेत हा युवक या अपघातात जागीच ठार झाला.
या अपघातास चिंचोरा फाट्यावर असलेले अनधिकृत पत्र्याचे शेड कारणीभूत असल्याचा आरोप आंदोलन कर्त्यांनी केला. या पत्र्याचे शेडमुळे रस्ताने आलेले वाहन दिसत नाही. यामुळेच अपघात होतात. त्यामुळे हे शेड तात्काळ काढण्यात यावे या मागणी ग्रामस्थांनी हा रास्तारोको केला.
त्यामुळे नगर-औरंगाबाद रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रास्तारोकोची माहिती मिळताच नेवासाचे पोलीस निरीक्षक विजय करे आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु शेड काढण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम राहिल्याने श्री.करे यांनी तहसीलदार व बांधकाम विभागाचे अधिकारी यांना आंदोलनस्थळी पाचारण केले. दोन दिवसात सदर शेड काढण्याचे आश्वासन दिल्याने रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.