मनमानी करणार्‍या सरपंचाला ग्रामस्थांनी धरले धारेवर

ऑनलाईन सभा तहकूब, ऑफलाईनसाठी मालदाड ग्रामस्थांचा आग्रह
मनमानी करणार्‍या सरपंचाला ग्रामस्थांनी धरले धारेवर

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

ऑफलाईन ग्रामसभा घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असतांना देखील मनमानी करुन सरपंचाने ग्रामसभा ऑनलाईन घेण्याचा हट्ट धरला. ही ग्रामसभा ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत हाणून पाडली. सरपंचाच्या मनमानीला तीव्र विरोध झाल्याने संगमनेर तालुक्यातील मालदाड ग्रामपंचायतीची सभा तहकूब करण्यात आली.

महात्मा गांधी जयंती निमित्ताने 2 ऑक्टोबर रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे मालदाड ग्रामपंचायतीकडून ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ग्रामपंचायतकडून सदस्यांना 30 सप्टेंबर 2021 रोजी सभेचा अजेंडा पाठविण्यात आला. त्यामुळे काही सदस्यांमध्येच ग्रामपंचायतीच्या कारभाराविषयी असंतोष निर्माण झाला होता. ऑनलाईन ग्रामसभेचा अजेंडा प्राप्त झाला असला तरी ग्रामस्थांना ग्रामसभेत विविध मुद्दे मांडावयाचे होते. त्यामुळे हजारो ग्रामस्थांनी ऑफलाईन ग्रामसभेची मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली होती. या मागणीला न जुमानता सरपंच गोरक्ष नवले यांनी ऑनलाईनच ग्रामसभा होईल, असा एकेरी सुर लावला. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते.

काल सकाळी 10 वाजता मालदाड ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा बोलविण्यात आली होती. या सभेला उपसरपंच गणेश भालेराव, सदस्या भामाबाई नवले, सदस्य अमित नवले, परशराम गोफणे, सदस्या सुनिता नवले, सदस्य मंगेश नवले, सदस्या दिपाली नवले, अश्विनी नवले, शालिनी नवले, प्रतिभा नवले व ग्रामसेविका मयुरी माळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या अजेंड्यावर मागील ग्रामसभेचे इतिवृत्त वाचन करणे व कायम करणे, 15 वा वित्त आयोग 2021-22, 2022-23 आराखडा बदल करणे, शासन परित्रक शालेय शिक्षण चालू करणे, गावातील कुपोषित बालकांचा आढावा व त्यावर उपाय योजना चर्चा करणे, विविध विकास कामांचा आढावा घेणे, एमआरईजीएसचा सन 2022-23 चा आराखडा तयार करणे, अपुर्ण राहिलेले विकास कामे पुर्ण करण्याबाबत चर्चा करणे, पीएमएवाय व रमाई आवाज योजना चर्चा करणे, गट नं 45/1,45/2 व 109 या जमिनीच्या न्यायालयीन कामाबाबत माहिती, गट नंबर 522 व 567 यामधील क्षेत्रामध्ये सामाजिक वनीकरणाचे झाडे लावणेबाबत, स्ट्रीट लाईट थकीत वीज बिलाबाबत चर्चा करणे, जल जीवन मिशन योजनेची अंमलबजावणीसाठी चर्चा करुन निर्णय घेणे, ग्रामपंचायत कर वसुलीबाबत, गायरान व देवस्थान इनाम जमिनीवरचे अतिक्रमण काढणेबाबत चर्चा करणे, तंटामुक्ती समिती गठीत करणे, मच्छिंद्रनाथ ट्रस्ट संबंधी चर्चा व निर्णय, व मा. अध्यक्ष यांच्या पूर्ण परवानगीने ऐनवेळी येणार्‍या विषयांवर चर्चा करणे आदी विषय घेण्यात आले होते.

ग्रामसभेच्या वेळेस पाऊस सुरु होता. तरी देखील मोठ्या संख्येने ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपस्थित होते. ऑनलाईन सभेचे कंट्रोल सरपंचांच्या हाती असल्याने ग्रामस्थांना आपले विषय मांडण्यात अडचण येत असल्याने ग्रामस्थांनी ऑफलाईन सभेची मागणी केली. मात्र सरपंच त्याला परवानगी देत नसल्याने ग्रामस्थांनी सरपंचांना चांगलेच धारेवर धरले. एकाधिकारशाही चालणार नाही, ऑफलाईन ग्रामसभा घेण्यात यावी, अशी ग्रामस्थांनी जोरदार मागणी केली. या मुद्यावर ग्रामस्थ आक्रमक झाले.

पाणी पुरवठ्याबाबत ठोस निर्णय न घेता चुकीच्या पद्धतीने नोटीसा पाठविणे, ग्रामपंचायत कारभारात मनमानी करणे, त्याचबरोबर ग्रामविकासाला खिळ बसेल, अशा चुकीच्या पद्धतीने विषयांवर चर्चा घेण्याचे सरपंचाने ठरविल्याने ग्रामस्थांनी त्यास विरोध केला. वैयक्तीक घरकुल कामांना विनाकारण आडवून ठेवणे, महिला सदस्यांना विश्वासात न घेता अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने ग्रामस्थ चिडले होते.

करोना पार्श्वभूमीवर ग्रामसभा ऑनलाईन घेण्याचे शासनाचे निर्देश आहेत, परंतु ग्रामस्थांची मागणी ही ऑफलाईन असल्याने आपण शासनाकडे तसा प्रस्ताव सादर करु, त्यानंतर शासनाकडून येणार्‍या निर्देशानुसार ग्रामसभा बोलविण्यात येईल, असे सरपंच गोरक्ष नवले यांनी ग्रामस्थांसमोर येवून सांगत आजची सभा तहकूब झाल्याचे जाहीर केले.

ग्रामसभेबाबत गावात कुठलीही दवंडी देण्यात आली नाही, गावात नोटीस लावण्यात आली नाही, केवळ सदस्यांना नोटीस पाठवून बोलाविलेली सभा बेकायदेशिर असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. आजपर्यंत मालदाडच्या इतिहासात ग्रामसभेला पोलीस बंदोबस्त नव्हता, मात्र काल होणार्‍या सभेला मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळेही ग्रामस्थ संतप्त झाले होते. भर पावसात सभेला महिला-पुरुषांसह गाव गोळा झाल्याने सरपंच एकाकी पडल्याचे चित्र दिसून आले.

Related Stories

No stories found.