कर्जत (प्रतिनिधी) -

करोना महामारीने आणि नैसर्गिक संकटाने अगोदरच आपल्याला खूप मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे

गावातील सर्व गट-तट बाजुला ठेऊन निवडणुकीसाठी होणार्या खर्चास फाटा देत गावच्या विकासासाठी व हितासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन काम करायचे आहे. आर्थिक खर्च वाचविण्याबरोबरच गावात असलेला राजकीय वाद संपुष्टात आणण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा, अन् आपल्या गावांना 30 लाखांचा विकास निधी घ्या, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी कर्जत- जामखेड तालुक्यातील निवडणूक कार्यक्रम लागलेल्या गावातील नागरिकांना केले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर स्थानिक पातळीवर सर्वसामान्य लोकांना जर कुणी दमबाजी, दबावतंत्र, दडपशाही व अन्य काही मार्गाचा अवलंब करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांची गय केली जाणार नाही, असे आ. रोहित पवार म्हणाले.

तालुक्यातील सुमारे 56 तर जामखेड तालुक्यातील 49 गावांच्या ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या अनुषंगाने आ. रोहित पवारांनी ही घोषणा केली आहे. बिनविरोध निवडणुका पार पाडलेल्या मोठ्या ग्रामपंचायतींना सी.एस.आर. फंडाच्या माध्यमातूनही अधिकचा निधी देण्यात येणार असल्याचे आ. पवार यांनी सांगितले.