
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
संक्रांत म्हटलं की आबालवृद्धांच्या डोळ्यासमोर येतात पतंग. या सणाला तीळगुळाचे जसे घट्ट नाते तसेच पंतगाचेही. संक्रांतीला नगरमध्ये विशेष उत्साह असतो. या दिवशी आसमंत पतंगांनी फुलून जातो. दरात वाढ होऊनही पतंग आणि मांजा खरेदीसाठी बाजारपेठ फुलून गेली आहे. बरेली, पांडा या मांजांना मोठी मागणी आहे. बंदी असलेल्या चायना मांजा विक्रीवर यंदा पोलिसांची करडी नजर असूनही काही ठिकाणी चोरी छुपके विक्री होत असल्याचे दिसून आले.
संक्रांतीला नगरमध्ये लहान मुलांबरोबरच तरुण व वयोवृद्धांमध्ये पतंगाबाबत कमालाची उत्सूकता असते. नगर शहरातील बागडपट्टी, सर्जेपूरा रोड, झेंडीगेट, माळीवाडा, भिंगार, सदरबाजार, केडगाव, कायनेटिक चौक, पाईपलाईन रोड, सावेडीगाव, प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग, नागापूरसह शहरातील विविध ठिकाणी पतंगाच्या बाजारपेठा सजल्या आहेत. चायना मांजाची लपवाछपवी होऊ नये म्हणून यंदा स्टॉल टाकताना प्रशासनाने काही अटी टाकल्या आहेत.
विक्रेत्यांनी पतांगांचे स्टॉल्स आकर्षिकरित्या सजविले आहेत. पतंग तयार करणार्या झेंडीगेट, बागडपट्टी येथील दुकानात देखील मोठी गर्दी पाहवयास मिळाली. पतंग उडविण्यासाठी मांजा देखील महत्वाचा असतो. मांजा जितका मजबूत तितका पतंग उडविण्याचा आनंद जास्त असतो.
प्रतिस्पर्ध्याचा पतंग कापण्यासाठी देखील मांजा मजबूत असावा लागतो. त्यामुळेच मांजा खरेदी पारखून करण्यावर तरूणाईचा भर असल्याचे दिसले. बरेली, सुरती, जे. के. पांडा, नवरंग पांडा, टिपू सुलतान, मैदानी स्पेशल आदी मांजाला विशेष पसंती असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून आले. मांजाचा 1 हजार मीटरचा रिळ 150 रूपयांपासून 500 रूपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहे. यंदा पतंगांच्या भावात 20 टक्क्यांनी वाढ झाली. मांजाचे दर मात्र टिकून आहे. तरुणाईचा उत्साहही चांगला आहे, असे प्रोफेसर कॉलनी येथील बालाजी पतंग सेंटरचे आनंद कारमपुरी यांनी सांगितले.
पतंगबाजीसाठी आतूर असलेल्या अनेक तरुणांनी इमारतीवर डीजे व ढोलीबाजाचेही बुकिंग केले आहे. गाण्यांच्या तालावर स्वार होत तरुणाई पतंगबाजीचा आनंद घेत असते. दे ढील, आखड, ओए काप्या अशा संवादांनी अनेक घर व इमारतींचे छत उद्या निनादून जाणार आहेत. ऐनवेळेस गडबड टाळण्यासाठी बहुतेकजण आधीच पतंग खरेदी करून संक्रांतीच्या सकाळीच पतंगबाजीसाठी सज्ज असतात.
सांबा, झोपडी, फर्र्या...
सांबा, फर्रा, झोपडी, रॉकेट, तागाभरी, गोंडा, बॉट्टल, मिकीमाऊस, बाहुबली, फुलपाखरू, मोदी, वाघ, सुरती, भवरा, तिरंगा आदींसह फॅन्सी पतंग विविध रंगाचे कागदी पतंग 4 रूपयांपासून ते 500 रूपयांपर्यंत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अॅग्रीबर्ड, सुपरमॅन, टॉम अॅण्ड जेरी, छोटा भीम, डोरेमॉन, बार्बी, मोटू-पतलू हे कार्टून पतंगांची बच्चेकंपनीत विशेष मागणी असल्याचे दिसले. प्लॅस्टिक पतंगांवर बंदी आहे. मात्र, अनेक ठिकाणी हे पतंगही विक्री होत असल्याचे चित्र आहे.
चायना मांजा... धसका अन् विक्री
नागरिकांसह पशू-पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरलेला चायना मांजावर प्रशासनाने बंदी घातली आहे. अनेक दिवसांपासून चायना मांजा विक्री करणार्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी चांगलाच धसका यावेळी घेतला आहे. मात्र, तरीही काहीजणांकडे ‘स्टॉक’ असल्याने या मांजाची चोरी-छुपे विक्री होत असल्याचे दिसते.