चांदेकसारे, जेऊरकुंभारी परिसरात सोयाबीन, मका पिकांचे मोठे नुकसान

चांदेकसारे, जेऊरकुंभारी परिसरात सोयाबीन, मका पिकांचे मोठे नुकसान

जेऊर कुंभारी (वार्ताहर) -

कोपरगाव तालुक्यात चांदेकसारे, जेऊर कुंभारी डाऊच खुर्द या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आप्पासाहेब मोहन जावळे, दिगंबर जावळे, यांच्या सोयाबीनच्या पिकात पाण्याचा अथांग समुद्र दिसत आहे.

शेतकऱ्याने मेहनतीने पिकांची जोपासना केली. पण गेल्या दोन-तीन दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचले आहेत. आता सोयाबीन काढण्यात आली होती पावसामुळे उभ्या असलेल्या सोयाबीनच्या शेंगा फुटू लागल्या आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिसकला गेला आहे. तेव्हा शासनाने प्रत्येक गावात पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.

आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोपरगाव तालुक्यातील हजारो एकर शेतातील सोंगलेली व उभ्या असलेल्या सोयाबीनला मोड फुटले आहेत. तर काही पाण्यात सडून गेली आहेत. मक्याचेही तेच झाले. कनस मोडून जमिनीवर टाकली व पाऊस सुरू झाला. त्या कणसांनाही मोड फुटू लागले. हाता तोंडाशी आलेले पीक डोळ्यासमोर वाया जाताना पाहायची वेळ शेतकऱ्यांवर आली. अजूनही पाऊस उघडत नसून शेतात पाय ठेवता आलेला नाही. शेत व पीक पाण्यात बुडाली असून गुडभर पाय शेतात जातात. यामुळे पाणी जिरेपर्यंत त्या पिकात काही राहण्याची तिळमात्र शक्यता राहिलेली नाही. या सोयाबीन व मका पिकांचे शेतकऱ्यांनी विमे उतरविले असून विमा कंपनी व कृषी विभागाने त्याचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.